भाजपला पडला वंदे मातरम्‌चा विसर

भाजपला पडला वंदे मातरम्‌चा विसर

जिल्हा परिषद सभा; शिवसेना-काँग्रेसवर कुरघोडी अंगलट

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना-काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न भाजपच्या अतिउत्साही सदस्यांच्या चांगलाच अंगलट आला. अध्यक्ष व सभागृहाच्या सचिवांनी सभेला येण्यास उशीर केला म्हणत भाजपने स्वतःच अध्यक्ष निवडत सर्वसाधारण सभेचे कामकाज रेटण्याचा डाव टाकला; मात्र हा डावच त्यांच्यावर उलटला. नियमानुसार वंदे मातरम्‌ने सभेच्या कामकाजाची सुरवात आणि राष्ट्रगीताने समारोप करावा लागतो; पण अतिउत्साही भाजपच्या सदस्यांनी राष्ट्रगीताने सुरवात केली. या वेळी शिवसेना सदस्यांनी सभा संपली समजायचे का, असा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, भाजप सदस्यांनी दिलगिरी व्यक्त केली. शिवाय कुरघोडींचा प्रयत्न फसल्यामुळे भाजप सदस्यांचे चेहरे पडले होते. 

जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक २३ सदस्य निवडून आलेले असतानाही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागल्याचे आंतरिक दुःख अद्यापही डागण्या देत आहे, याची प्रचीती पहिल्याच सर्वसाधारण सभेत दिसून आली. 

दुपारी एक वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते; परंतु दोन वाजले तरीही जिल्हा परिषद अध्यक्ष, पदाधिकारी व प्रमुख अधिकारी सभागृहात आलेले नव्हते. भाजपचे सर्व सदस्य वेळेवर येऊन बसले. त्यामुळे त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी येण्यापूर्वी शिवसेनेला धारेवर धरण्याची रणनीती आखली. जर सभेसाठी अध्यक्ष वेळेवर सभागृहात हजर नसतील; तर जिल्हा परिषद अधिनियमानुसार आणि गणपूर्ती झाली असेल; तर उपस्थितांमधून अध्यक्ष निवडून कामकाज चालवता येते याची आठवण भाजप सदस्य एल. जी. गायकवाड यांनी करून दिली. एवढेच नाही तर अध्यक्षपदाच्या खुर्चीवर भाजपचा सदस्य पाहण्यासाठी असुसलेल्या सदस्यांनी लगेच शिवाजी पाथ्रीकर यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यांना अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान होण्याची विनंती केली. श्री. पाथ्रीकर हेदेखील अध्यक्षांच्या खुर्चीवर जाऊन बसले. 

नेमके काय झाले ?
भाजप सदस्य गायकवाड यांनी सर्वांना उभे राहण्याची विनंती केली. तेवढ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती विलास भुमरे, मीना शेळके आदींसह सर्व प्रमुख अधिकारी सभागृहात आले; पण त्याकडे दुर्लक्ष करीत भाजपच्या सदस्यांनी ‘‘वंदे मातरम्‌ शुरू करेंगे शुरू कर’’ म्हणत थेट ‘‘‘जन गण मन’’ म्हणत सुरवात केली. हा प्रकार शिवसेना सदस्यांचा लक्षात आला. राष्ट्रगीत संपल्यानंतर शिवसेनेसह काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपवर राष्ट्रगीत व वंदेमातरम्‌चा अवमान केल्याचे म्हणत पलटवार केला. राष्ट्रगीत म्हटल्यामुळे सभा संपली असे जाहीर करावे लागेल; कारण सभेची सांगताच राष्ट्रगीताने केली जाते याची आठवण करून देत भाजपला कोंडीत पकडले. आपले चुकल्याची जाणीव झाल्यावर भाजप सदस्यांनीसुद्धा दिलगिरी व्यक्त केली. पुन्हा सर्व सदस्यांनी वंदेमातरम्‌ म्हटले आणि त्यानंतरच सर्वसाधारण सभेच्या कामाला सुरवात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com