भाजपमध्ये इनकमिंग सुरूच

भाजपमध्ये इनकमिंग सुरूच

सत्तेच्या प्रभावापुढे निष्ठा ठरतेय कुचकामी

औरंगाबाद - केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली आहे. सत्तेत असल्याने भाजपमध्ये अद्यापही इनकमिंग जोरात सुरू आहे. आता शिवसेनेत निष्ठावंत आणि पक्ष बांधण्यासाठी काम केलेले कार्यकर्तेसुद्धा भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. सत्तेच्या प्रभावापुढे निष्ठा कुचकामी ठरत आहे. एकानंतर एक होत असलेल्या प्रवेशामुळे भाजपमध्ये जुने विरुद्ध नवे असा संघर्ष असला तरी भाजप याकडे फायद्याचा सौदा म्हणून पाहत आहे. 

राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा झेंडा हातात घेतला.

शिवसेनेचे मध्य विभागाचे उपविभागप्रमुख उद्योजक अशोक जगधने यांनी शनिवारी (ता.२२) भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांनीही प्रयत्न केले होते. शिवसेनेच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांना पक्षात घेऊन भाजप संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर देत आहे. विशेषत: किशनचंद तनवाणी यांनी शहर, जिल्हा अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून संघटन मजबुतीकरणावर भर दिला आहे.

भाजपमध्ये येण्यापूर्वी त्यांनी शिवसेनेत संघटनात्मक पातळीवर महत्त्वाची पदे भूषविली आहेत. ते आमदार, महापौरही राहिलेले आहेत. शिवसेनेतील दीर्घ काळाच्या प्रवासात या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी असलेल्या ऋणानुबंधाचा ते आता लाभ उठवत आहेत. कोणता पदाधिकारी, कार्यकर्ता नाराज आहे याची खडान्‌खडा माहिती असल्याने त्यांच्यावर जाळे फेकून त्यांना भाजपकडे ओढण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.

विधानसभा  निवडणुकीच्या वेळी किशनचंद तनवाणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्याबरोबर जगदीश सिद्ध, सुरेंद्र कुलकर्णी, राजेश डोंगरे यांनी प्रवेश केला. त्यांच्यानंतर आमदार संजय सिरसाट यांचे अतिशय जवळचे असलेले शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. माजी खासदार, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांचे समर्थक समीर राजूरकरही भाजपमध्ये यापूर्वीच दाखल झाले आहेत. तसे श्री. राजूरकर यापूर्वीही भाजपची युवा आघाडी असलेल्या ‘भाजयुमो’मध्ये काम करीत होते. औरंगाबाद हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला आहे. या किल्ल्यास अनेकांनी खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अपयशी ठरला. शिवसेनेत संघटनात्मक बांधणी करणारे; पण अंतर्गत गटबाजी व इतर कारणांमुळे नाराज असलेल्यांना आपल्याकडे ओढत भाजपला शहरात बळकटी देण्याचे काम केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com