भाजपची मदार अपक्ष नगरसेवकांवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - महापौर निवडणुकीसाठी चाळीस दिवस शिल्लक असले तरी शिवसेनेवर कुरघोडी करून ‘चमत्कार’ घडवून आणण्यासाठी भाजप पदाधिकारी सरसावले आहेत. भाजपची मदार अपक्षावर असून, पक्षाला बाजूला ठेवून अपक्ष म्हणून निवडून आलेलाच उमेदवार देण्याची व्यूहरचना आखली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचा महापौरपदाचा दीड, एक व अडीच वर्षे असा फार्मुला आहे. त्यानुसार पुढील अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर राहणार आहे. असे असली तरी आगामी महापौर निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. काही पदाधिकारी त्यासाठी तयारीला लागले आहेत. आकड्यांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. भाजपकडे बहुमताच्या जादूई आकड्यापर्यंत जाण्यासाठी संख्याबळ कमी आहे. भाजपकडे केवळ २३ नगरसेवक आहेत; तर भाजपचेच मात्र अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आघाडीकडे १३ नगरसेवक आहेत. असे असले तरी भाजपने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत. एमआयएमचा पाठिंबा घ्यायचा असेल तर अपक्ष म्हणून निवडून आलेला उमेदवार द्यायचा व काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत घ्यायचे. भाजपला मात्र तटस्थ ठेवायचे असा एक, तर दुसरा पर्याय भाजपचा उमेदवार द्यायचा व अपक्षांना सोबत घेऊन शिवसेनेवर कुरघोडी करायची असे मनसुबे आखण्यात येत आहेत. त्यासाठी नगरसेवकांसोबत बोलणी सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेतील पक्षीय बलाबल
पक्ष    नगरसेवक

शिवसेना    २८
भाजप    २३
एमआयएम    २४  
काँग्रेस    ११
अपक्ष    १८
बीएसपी    ०५
राष्ट्रवादी काँग्रेस     ५    
रिपाइं (डे)    १
एकूण     ११५

Web Title: aurangabad marathwada news BJP independent candidate