'ब्लू व्हेल'चा धोका कायम

मनोज साखरे
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

सोशल साइटवर लिंक्‍स पसरल्या; विविध नावांनी उपलब्ध गेम

सोशल साइटवर लिंक्‍स पसरल्या; विविध नावांनी उपलब्ध गेम
औरंगाबाद - अनेकांच्या जिवावर बेतलेल्या राक्षसी "ब्लू व्हेल चॅलेंज' गेमवर केंद्र सरकारने बंदी घातली; मात्र या गेमचा धोका कायम असून, अधिक तीव्रतेने हा गेम फोफावत आहे. "ब्लू व्हेल'वरील बंदीनंतर आता हा गेम विविध नावांनी संकेतस्थळांवर उपलब्ध असून, अनेक जण तो सर्रास डाउनलोड करीत असल्याची बाब समोर आली आहे.

'पोकोमॅन गो' या गेमला आवरेपर्यंत भारतात "ब्लू व्हेल'नेही विळखा घालण्यास सुरवात केली आहे. या गेमचा बळी मुंबईतील मनप्रीत सहानी ठरला. या मुलाने 30 जुलैला सातमजली इमारतीहून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर देशात या घटनेचे व "ब्लू व्हेल चॅलेंज' या गेमचे आव्हानच उभे ठाकले आहे. यानंतर खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने गेमवर देशात बंदी घातली गेली. इंटरनेटवर लिंक्‍स दिसू नयेत म्हणून सोशल नेटवर्किंग साइटला सूचना व निर्देश दिले; परंतु अजूनही या लिंक्‍स हटविण्यात आल्या नाहीत.

प्ले स्टोअरमध्येही हा गेम असून, विविध नावाने या गेमच्या लिंक्‍स उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे "ब्लू व्हेल'चा धोका अधिक संभवत आहे. या गेमच्या गाजावाजानंतर अनेकांनी गुगलवर हा गेम सर्च केला. तसेच, डाउनलोडही केला. गेमच्या लिंक व डाउनलोडिंग सुरूच राहिल्यास याचे विघातक परिणाम समोर येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. "ब्लू व्हेल चॅलेंज' हा गेम "क्‍लबटाइप चॅटरूम' आहे. यात मेन बॉस यूजर्सना हुकूमशाही पद्धतीने एकप्रकारे आदेशच देत असतो.

मानसिकतेवर आघात हे प्रमुख लक्ष्य असून, हा गेम मृत्यूकडे नेणारा आहे. त्यामुळे या गेमच्या लिंकशीही संबंध न ठेवता संभाव्य धोका टाळावा, असे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे.

ब्लू व्हेल गेमवर बंदी घातली गेली असली तरी या गेम्सच्या हुबेहूब लिंक्‍स वेगवेगळ्या नावाने इंटरनेटवर उपलब्ध आहेत. लक्ष्यापर्यंत गेम डिलिव्हर करायचा हे निर्मात्याचे व अपप्रवृत्तींचे प्रयत्न आहेत.
- वैभव कुलकर्णी, सायबर तज्ज्ञ

'सर्च' डेटाबेसनुसार
- तीन महिन्यांत देशातील 14 कोटी यूजर्संनी "ब्लू व्हेल' नाव सर्च केले.
- मुंबई व उपनगर "ब्लू व्हेल' नाव सर्च करण्यात आघाडीवर
- मुंबईनंतर दिल्ली, पुणे व बंगळूरस्थित यूजर्सचा सर्च करण्यात क्रमांक

Web Title: aurangabad marathwada news blue whale game danger