रेल्वेशी संबंधित उद्योग आणणार - पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

परळी-बीड रेल्वे कामांना 3 जूनपासून सुरवात

परळी-बीड रेल्वे कामांना 3 जूनपासून सुरवात
औरंगाबाद - परळी-नगर हा रेल्वेमार्ग बीडकरांसाठी माइलस्टोन आहे. नगर -बीडदरम्यान बीड जिल्ह्यातील हद्दीचे 19 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, परळी-बीडदरम्यानच्या कामांना तीन जूनला सुरवात होणार आहे. या वेळी रेल्वेशी निगडित उद्योग बीडमध्ये यावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक चर्चेत सांगितले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, 'बीडसाठी रेल्वे महत्त्वाची आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळी येथे 3 जूनला कार्यक्रम आहे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शब्द दिला आहे. त्यामुळे 2019 पर्यंत रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होण्याची आशा आहे. बीडमध्ये रेल्वेविना भौगोलिक मागासलेपण आहे, ते यानिमित्त दूर होणार आहे. तसेच मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री परळीत येत असल्याने त्यांच्याकडे रेल्वेशी संबंधित उद्योग बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू व्हावेत, यासाठी मागणी करणार आहे. पाणी कमी लागणारे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न राहील,'' असेही मुंडे यांनी सांगितले.

नगर - बीडदरम्यान रेल्वे मार्गावरील बीड हद्दीतील आतापर्यंत 19 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच तीन जूनपासून परळी - बीड दरम्यानच्या कामांना सुरवात होणार आहे. परळी - नगर रेल्वेमार्गासाठी आता दोन्हींकडून कामांना सुरवात झाल्याने 2019 पर्यंत पंतप्रधानांनी दिलेला शब्द खरा ठरेल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Web Title: aurangabad marathwada news To bring about the relation related to the industry