मुलाच्या हत्येची धमकी देत व्यापाऱ्याला लुटले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - मुलाचा फोटो दाखवून तो ओलिस असल्याचा बनाव करून किराणा दुकानदाराला दोघांनी भरदिवसा लुटले. ही खळबळजनक घटना शनिवारी (ता. सात) सकाळी अकराच्या सुमारास दशमेशनगरातील भारतीय स्टेट बॅंकेजवळ घडली. लूट केल्यानंतर दोघांनी व्यापाऱ्याकडे असलेले एटीएम कार्ड हिसकावत वीस हजार रुपये काढले. 

औरंगाबाद - मुलाचा फोटो दाखवून तो ओलिस असल्याचा बनाव करून किराणा दुकानदाराला दोघांनी भरदिवसा लुटले. ही खळबळजनक घटना शनिवारी (ता. सात) सकाळी अकराच्या सुमारास दशमेशनगरातील भारतीय स्टेट बॅंकेजवळ घडली. लूट केल्यानंतर दोघांनी व्यापाऱ्याकडे असलेले एटीएम कार्ड हिसकावत वीस हजार रुपये काढले. 

विजय अर्जुन ठाणगे (रा. शंभूनगर) असे लुबाडलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचे घराजवळच किराणा दुकान आहे. दुचाकीचा हप्ता भरण्यासाठी ते शनिवारी सकाळी दशमेशनगरातील भारतीय स्टेट बॅंकेत गेले. बॅंकेत हप्ता भरून ते घराकडे वीस हजार रुपये घेऊन निघाले. फर्निचरचे काम करणाऱ्या कामगारांना हे पैसे द्यायचे होते; पण त्यांच्याकडे पैसे बघून बॅंकेबाहेर उभे असलेल्या दोघांनी त्यांना अडवले. ‘आम्ही मुलाला ओलिस ठेवले, त्याला ठार मारू!’ अशी धमकी त्यांनी दिली. ही बाब खरी समजून ठाणगे घाबरले. 

दोघांनी त्यांना दशमेशनगर येथील एका वाहनाच्या शोरूमजवळ नेले. तेथे एका कोपऱ्यात नेत दोघांनी एटीएम कार्ड, वीस हजार रुपये व मोबाईल लुबाडला व दोघे पसार झाले.  दरम्यान, ठाणगे घरी पोचले. त्यावेळी मुलगा सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. तसेच भामट्यांनी बनाव केल्याचे उघड झाले. यानंतर भामटे दशमेशनगर येथील युनियन बॅंकेच्या एटीएम सेंटरमध्ये शिरले. तेथून ठाणगे यांच्या आईच्या खात्यावरील वीस हजार रुपये काढून त्यांनी पोबारा केला. 

दरम्यान, या दोन्ही घटनेनंतर ठाणगे व त्यांच्या आईने उस्मानपुरा पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीनुसार, दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक वामन बंडेवाड करीत आहेत.

नवी मोडस...
दोघांनी ठाणगे यांना गाठल्यानंतर ‘ओळख नाही का?, बऱ्याच दिवसांनी भेटलात,’ असे म्हणून हस्तांदोलन केले. त्यानंतर ठाणगेंना त्यांच्या साडेचार वर्षांच्या मुलाचा फोटो दाखवला. तो ओलिस असल्याचे सांगून ‘चुपचाप सोबत चला, मुलाजवळ आमची एक व्यक्ती आहे. त्याला तेथेच ठार मारू!’ अशी धमकी दिली होती. 

अस्पष्ट फुटेज
लुबाडण्याचा प्रकार भारतीय स्टेट बॅंकेजवळ घडला. यानंतर उस्मानपुरा पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले; परंतु त्यात संशयित स्पष्ट दिसत नव्हते. 

असुरक्षितता वाढतेय
व्यंकटेशनगर येथील तेरा तोळे सोन्याची चोरी, तसेच अरुणोदय कॉलनीत पंचवीस तोळे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम अशा गंभीर चोऱ्या घडल्यानंतर आता थेट लुटीच्या घटनांनी खळबळ निर्माण केली आहे. पोलिसांकडून वेळीच ठोस उपाय राबविले जात नसल्याने अशा घटनांमुळे शहरात असुरक्षितता वाढीस लागत आहे.

Web Title: aurangabad marathwada news businessman loot