प्रमाणपत्रे मिळाली, पैशांचा पत्ता नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - कर्जमाफी अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात साडेआठ लाख खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये चार हजार कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आल्याचे शासनाने जाहीर केले असले तरी प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र मिळालेल्या मराठाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसै जमा झालेले नाहीत. विविध कारणांमुळे आधी वेळकाढूपणा आणि अंमलबजाणीनंतर सुरु झालेला पुन्हा घोळ यामुळे शेतकऱ्यांतील संताप अजून शांत झालेला नाही.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई गेल्या 18 ऑक्‍टोबरला प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमाफीचा पहिला टप्पा सुरू झाला. त्याचवेळी जिल्हास्तरावर पालकमंत्री किंवा अन्य मान्यवरांच्या हस्ते काही शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या प्रमाणपत्रांसह भेटवस्तू देण्यात आल्या. त्यात औरंगाबादेत 21, जालना 25, लातूर 22, नांदेड 23, हिंगोली 23, परभणी 19, बीड 15, उस्मानाबादमधील 23 शेतकऱ्यांचा समावेश होता. प्रमाणपत्रे वाटपावेळीही यादी न मिळणे, यादीत नाव नसणे असे प्रकार समोर आले होते. त्यावर कशीबशी मात करुन प्रमाणपत्रांचा सोपस्कार पूर्ण झाला. आजपर्यंत संबंधितांच्या खात्यात पैसै जमा किंवा मूळ कर्जातून वळते झालेले नाहीत. पैसे जमाच न झाल्यामुळे उस्मानाबादेतील भारत तांबे या शेतकऱ्याने प्रमाणपत्रही परत केले.

Web Title: aurangabad marathwada news certificate, money loanwaiver