औरंगाबाद - ‘सकाळ’ कार्यालयात निवडक मुलांसाठी रविवारी आयोजित कार्यशाळेत बनवलेला बाप्पा दाखविताना मुले. सोबत मूर्तिकार नारायण डवले आणि प्रमोद डवले.
औरंगाबाद - ‘सकाळ’ कार्यालयात निवडक मुलांसाठी रविवारी आयोजित कार्यशाळेत बनवलेला बाप्पा दाखविताना मुले. सोबत मूर्तिकार नारायण डवले आणि प्रमोद डवले.

चिमुकल्यांनी घडवला लाडका बाप्पा

‘सकाळ’तर्फे मातीच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा; चिमुकल्यांचा भरपावसातही प्रतिसाद

औरंगाबाद - ‘सकाळ’तर्फे आयोजित जैविक शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेला भरपावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘सकाळ’ कार्यालयात रविवारी (ता. २०) सकाळी झालेल्या या कार्यशाळेत विविध वयोगटांतील शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपला लाडका बाप्पा घडवला.

शाडू मातीच्या नावाखाली फायर क्‍ले, चायना क्‍लेपासून बनवलेल्या मूर्ती ग्राहकांना विकण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. ‘सकाळ’ने या प्रकाराला वाचा फोडून खऱ्या जैविक शाडू मातीची ओळख करून दिली. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी मातीच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी मूर्तिकार नारायण डवले आणि प्रमोद डवले यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. ‘सकाळ’ कार्यालयात घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत त्यांनी शहरभरातून आलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. पाऊस पडत असतानाही मुलांनी कार्यशाळेला येण्याचा हट्ट केला, असे पालकांनी आवर्जून सांगितले.

खगोलतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर, राज्य सेवाकर सहायक आयुक्त चंद्रशेखर बोर्डे, ॲड. स्वप्नील जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यशाळेला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

‘‘हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. लहान मुलांमध्ये एक उत्साह निर्माण झाला आणि त्यातूनच मुलांनी आपल्या हाताने छोट्या छोट्या सुंदर मूर्ती घडवल्या. व्यापक जागृतीसाठी अशा उपक्रमांची गरज असून, ‘सकाळ’ने पुनःपुन्हा असे उपक्रम आयोजित करावेत,’’ अशा शब्दांत श्रीनिवास औंधकर यांनी कार्यशाळेची प्रशंसा केली.

विविध प्रकारांचे प्रशिक्षण
गणपतीच्या मूर्ती घडवण्याच्या अनेक प्रकारांचे प्रशिक्षण श्री. डवले यांनी विद्यार्थ्यांना दिले. यात साचा वापरून गणपती बनवणे, मातीचे गोळे जोडून मूर्ती घडवणे आणि एकसंध ठोकळ्यातून सममिती तंत्राद्वारे गणपतीला आकार देणे, अशा तीनही प्रकारांतून विद्यार्थ्यांनी मूर्तिकला आत्मसात केली. मूर्ती घडवण्यासाठी लागणाऱ्या विविध उपकरणांची ओळख आणि त्यांचा कुशल वापर मुलांनी करून घेतला.

अशी कमावली जैविक शाडू माती
सध्या बाजारात खऱ्या शाडू मातीच्या मूर्ती दुर्मिळ झाल्या आहेत. अनेक ठिकाणी फायर क्‍ले, चायना क्‍लेच्या मूर्ती शाडू मातीच्या नावाखाली विकल्या जात आहेत. त्यामुळे स्थानिक मातीच्या विविध प्रकारांच्या मिश्रणातून जैविक शाडू कमावण्याची पद्धत श्री. डवले यांनी समजावून सांगितली. यात चिकटपणा असलेली लाल माती, कडकपणा येण्यासाठी पांढरी माती, सहज उपलब्ध असलेली पोयटा माती, मजबुती येण्यासाठी मुरमाड माती आणि घट्टपणासाठी कागदी लगदा वापरून टिकाऊ आणि सुंदर मूर्ती बनवता येतात, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी पाहिले.

फायर क्‍लेपेक्षा स्थानिक माती अधिक पर्यावरणपूरक आहे. या मातीचा वापर वाढल्यास स्थानिक कारागिरांनाही प्रोत्साहन मिळेल. ‘सकाळ’ने हा मुद्दा उचलून जागृतीपर कार्यशाळा घेतली, हे स्तुत्य आहे.
- प्रमोद डवले, मूर्तिकार.

आपल्या आसपास मिळणारी माती गणपती बनवण्यासाठी वापरायला हवी. विसर्जनानंतर त्यातून कुठलेही प्रदूषण होणार नाही. शिवाय आपला गणपती आपणच बनवण्याचा वेगळाच आनंद मुलांना मिळेल.
- नारायण डवले, मूर्तिकार.

मीच बनवलेला हा बाप्पा मला खूप आवडला. आम्ही यंदा हाच गणपती बसवणार घरी.
- विभा

मला खूप छान वाटलं. अजून गणपती बनवायला मी शिकेन आणि मूर्ती बनवीन.
- आद्या


‘सकाळ’मध्ये शिकल्यानंतर दिवसभरात मी घरी चार गणपती बनवले. खूप मज्जा आली.
- कैवल्य


मूर्ती बनवायला खूप मजा आली. मी आणि माझा दादा सक्षम दोघांनीही बाप्पा बनवला. आम्ही त्याचीच पूजा करणार.
- शौर्य 

मी आणि ताईने इथे बनवलेला बाप्पाच आम्ही बसवणार आहोत. मी नेहमी असाच गणपती बनवणार आहे.
- राधा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com