नगरसेवक भांडले, प्रशासन सुटले

नगरसेवक भांडले, प्रशासन सुटले

औरंगाबाद - शहरातील अतिक्रमणांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी शनिवारी (ता. सहा) घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत दमडी महल परिसरातील कारवाईला धार्मिक रंग देण्यात आल्यामुळे शिवसेना-भाजप व एमआयएमच्या नगरसेवकांत जोरदार खडाजंगी झाली. सुमारे पाच तास आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. नगरसेवकांच्या भांडणामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. विशेष म्हणजे, सभेत आयुक्तांवर एक शब्दही बोलण्याची वेळ आली नाही!

दमडी महल परिसरातील श्रीराम पवार यांच्या घराचे अतिक्रमण हटविल्यावरून महापालिकेतील राजकारण चांगलेच पेटले आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी एमआयएम पक्षाने, तर अतिक्रमणाला अभय देण्यासाठी शिवसेनेने प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यात भाजपचे स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी हे अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते.

त्यामुळे एकाकी पडलेल्या शिवसेनेचा तिळपापड झाला. या प्रकरणात मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी उडी घेऊन श्री. पवार यांच्या पुनर्वसनासाठी जागा मिळवून दिली. त्यानंतर स्थायी समिती सदस्यांच्या मागणीवरून विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सभेला प्रारंभ होताच राज वानखेडे यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधी पक्षनेते फेरोज खान यांनी या कारवाईसाठी महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणला. हे घर एका हिंदू व्यक्तीचे होते म्हणून कारवाईनंतर फटाके देखील फोडण्यात आल्याचा आरोप केला. विकास एडके यांनी भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत स्थायी समिती सभापतींच्या आदेशावरूनच कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले. राजेंद्र जंजाळ यांनी ही जागा नेमकी कोणाची आहे? भूसंपादन प्रक्रिया राबविण्याची पद्धत काय? एखाद्याच्या घराचा दरवाजा तोडून आत घुसून अतिक्रमण हटविण्याची पद्धत आहे का? अशाच प्रकारे एखाद्या मुस्लिम व्यक्तीचे अतिक्रमण हटविले असते तर शहर शांत राहिले असते का? असे प्रश्‍न उपस्थित केले. 

सभागृहनेते विकास जैन, राजू वैद्य, राजू शिंदे, प्रमोद राठोड, ॲड. माधुरी अदवंत, शिल्पाराणी वाडकर यांनी महापालिकेने केलेली कारवाई व त्यात एमआयएम नगरसेवकांनी केलेला हस्तक्षेप याचा निषेध करीत कारवाईची मागणी केली. एमआयएमचे गंगाधर ढगे यांनी याच परिसरात सात मुस्लिमांची घरे पाडण्यात आली. त्या वेळी कोणी समोर आले नाही. विकास हवा असेल तर अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करावेच लागतील, असे मत व्यक्त केले. त्यावरून सभागृहात गोंधळ निर्माण झाला. अतिक्रमणाला आमचा पाठिंबा नाही; मात्र आतापर्यंत महापालिकेने अशा पद्धतीची कारवाई केलेली नाही आणि कोणी नगरसेवकाने हस्तक्षेप केला नाही? हस्तक्षेपाला आमचा विरोध असल्याचे युतीच्या नगरसेवकांनी सांगितले. नासेर सिद्दीकी, अयुब जागीरदार, सरवत बेगम, इर्शाद खान यांनी फेरोज खान हे महापालिका अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी गेले होते. हिंदू-मुस्लिम असा रंग देणे चुकीचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

खरवडकरांना दाखविली जागा 
दमडीमहल येथील कारवाईसंदर्भात नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्‍नावर खुलासा करण्यासाठी नगररचना विभागाचे जयंत खरवडकर उभे राहिले असता, श्री. वानखेडे यांनी हे नेमके कोणत्या विभागाचे अधिकारी आहेत? याचा खुलासा घेण्याची मागणी केली. उपायुक्त वसंत निकम यांनी एप्रिल २०१७ ला त्यांची अतिक्रमण विभागात मूळ पदस्थापना करण्यात आली होती; मात्र ते नगररचना विभागात काम करतात असे सांगितले. ज्या अधिकाऱ्यांनी घोळ केला त्यांच्याकडून आम्हाला खुलासा नको, अशी भूमिका श्री. वानखेडे, श्री. जंजाळ यांनी घेतली. या वेळी एमआयएम नगरसेवकांनी श्री. खरवडकर यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जंजाळ यांनी आक्रमक पवित्रा घेताच महापौरांनी उपअभियंता ए. बी. देशमुख यांना खुलासा करण्याच्या सूचना केल्या. 

भूसंपादनाची प्रक्रिया काय? 
सरकारी जागेचे भूसंपादन करतानाची प्रक्रिया काय? याचा खुलासा करण्याचा प्रयत्न ए. बी. देशमुख यांनी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर श्री. जंजाळ यांचे समाधान झाले नाही. महापौरांनी या संदर्भात आयुक्तांनी चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले.

ॲक्‍शन प्लॅन तयार करा 
संपूर्ण शहरातील अतिक्रमणांवर चर्चा करण्यासाठी सभा घेण्यात आली; मात्र सिद्धांत शिरसाट, अफसर खान यांनीच वॉर्डातील अतिक्रमणांचे विषय उपस्थित केले. महापौरांनी मात्र विकास आराखड्यातील रस्ते, अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांच्या विरोधात करवाई करणे यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com