आमदारपुत्र नगरसेवकावर राजीनाम्याच्या धमकीची वेळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - वर्षभरापासून पाठपुरावा करूनदेखील वॉर्डातील एका पेट्रोलपंपाचे अतिक्रमण हटविण्यात येत नसल्याने हतबल झालेले आमदारपुत्र नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी मंगळवारी (ता. सात) थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला. आठवडाभरात प्रशासनाने हा पंप न हटविल्यास आयुक्‍तांकडे नगरसेवकपदाचा राजीनामा सादर करू, असे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत चप्पल-बूट न घालण्याचा पणदेखील त्यांनी केला. श्री. शिरसाट हे शिवसेनेचे नगरसेवक असून, गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे, हे विशेष. 

बन्सीलालनगर वॉर्डाचे नगरसेवक असलेले श्री. शिरसाट हे महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य असून, प्रत्येक बैठकीत ते वॉर्डातील समस्या मांडत आहेत. सभापती गजानन बारवाल यांनी त्यांच्या मागणीनुसार वारंवार प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले; मात्र अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यावरून त्यांनी गेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती.

त्यापूर्वीदेखील सभापतींच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला होता. दरम्यान, गेल्या बैठकीला आयुक्त डी. एम. मुगळीकर स्वतः हजर होते. त्यांनी तीन दिवसांत रेल्वेस्टेशनसमोरील पेट्रोलपंपाचे अतिक्रमण काढण्याचे आश्‍वासन दिले होते. तीन दिवस उलटले तरी अद्याप पंपावर कारवाई झाली नसल्याने श्री. शिरसाट यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, ‘‘प्रशासनाने पेट्रोलपंपाच्या बाजूच्या हॉटेल आणि दुकानांना नोटिसा दिल्या आहेत; परंतु पेट्रोलपंपाला नाही. म्हणून येत्या आठ दिवसांत कारवाई झाली नाही तर मी आयुक्‍तांकडे नगरसेवकपदाचा राजीनामा देईल.’

चप्पल न घालण्याचा केला पण... 
वाहतुकीला अडथळा ठरणारा पेट्रोलपंप हटत नाही तोपर्यंत पायात चप्पल किंवा बूट घालणार नाही, असा ‘पण’देखील श्री. शिरसाट यांनी केला आहे. त्यानुसार मंगळवारपासून ते अनवाणी पायाने फिरत आहेत. 

आमदार पुत्र असूनही... 
नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांना आमदार संजय शिरसाट यांनी कामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या नाहीत का? असे विचारले असता, अधिकारी आमदारांचेदेखील ऐकत नसल्याचे त्यांनी सांगितले. अतिक्रमणे हटविण्याऐवजी अधिकारी अतिक्रमणधारकांना वेगवेगळे सल्ले देत आहेत, असा आरोपही श्री. शिरसाट यांनी केला.

या आहेत मागण्या 
रेल्वेस्टेशन येथील पेट्रोलपंप हटविणे
बीड बायपास रस्त्याचे रुंदीकरण करणे
विकास आराखड्यानुसार रेल्वेस्टेशन भाजीमंडई येथील 
१२ मीटर रस्ता मोकळा करणे
हॉलिडे कॅम्पलगत असलेला विकास आराखड्यातील 
रस्ता नऊ मीटर रुंद करणे. 
जालाननगर येथील उद्यानाला संरक्षण भिंत बांधणे.

Web Title: aurangabad marathwada news corporator resign announcing