दोन कारच्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

दौलताबाद - थोरल्या बहिणीचा मृतदेह मुंबईहून मेहकरकडे शववाहिनीतून घेऊन जात असताना दोन कारचा अपघात होऊन त्यात गर्भवती असलेली धाकटी बहीण व तिचा पती असे दोघेही ठार झाले. ही घटना बुधवारी (ता.२८) पहाटे पाचच्या सुमारास नागपूर- मुंबई महामार्गावर आसेगाव (ता. औरंगाबाद) येथे घडली.  

दौलताबाद - थोरल्या बहिणीचा मृतदेह मुंबईहून मेहकरकडे शववाहिनीतून घेऊन जात असताना दोन कारचा अपघात होऊन त्यात गर्भवती असलेली धाकटी बहीण व तिचा पती असे दोघेही ठार झाले. ही घटना बुधवारी (ता.२८) पहाटे पाचच्या सुमारास नागपूर- मुंबई महामार्गावर आसेगाव (ता. औरंगाबाद) येथे घडली.  

मुंबई येथील मीर भाईंदर येथील रहिवासी यास्मीन मकसूद अहेमद यांची मेहकर (ता. बुलडाणा) येथील थोरली बहीण मुंबई येथे भेटण्यासाठी आली असता तिचा तेथे आकस्मिक  मृत्यू झाला. थोरल्या बहिणीचा मृतदेह शववाहिनीत, तर गर्भवती असलेली धाकटी बहीण यास्मीन व तिचा पती मकसूद हे कारमध्ये मुंबईहून मेहकर येथे चालले होते. आसेगाव चौफुली येथे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास दोन कारमध्ये भीषण अपघात होऊन त्यात मकसूद मन्सूर अहेमद (वय ३६), यास्मिन मकसूद तनवर (वय ३२) रा. टॉवर ग्रीन पार्क, मीरा भयदंर रोड, पूर्व मुंबई  यांचा मृत्यू झाला, 
अपघातस्थळावरून विव्हळण्याचा आवाज ऐकू आल्याने आसेगाव चौफुलीवरील काही हॉटेलचालक घटनास्थळी धावले. त्यांनी अपघातग्रस्त गाडीच्या सोबत असलेल्या शववाहिनीमधून जखमी यास्मिन व तिचा पती मकसूद अहमद यांना ‘घाटी’ रुग्णालयात पाठविले. तेथे जाईपर्यंत रस्त्यातच दोघांचा मृत्यू झाला.

यास्मिन व मकसूद त्यांच्या होंडा सिटी कार (क्रमांक टी एस- १५ ई बी- ०२२४) ने मुंबईहून मेहकरकडे जात होते, तर हैदराबादहून शेवरलेट (आर जे- २७ सी ए- ६७४०) या कारमधून शिर्डीला दर्शनाला जाणारे ईश्‍वरआप्पा मोलला (वय ३१), गायत्री अनाजलिलू मोलला (वय २९) हेही  या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर अपघाताची नोंद दौलताबाद पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रेमसागर चांद्रमोरे यांच्या मार्गदर्शनात फौजदार विक्रम वडने हे करीत आहेत.

टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यातील काही जणांनी गाड्यांच्या चुराड्यात दबलेल्या अपघातग्रस्तांची मदत न करता त्यांच्याजवळील चाळीस ते पन्नास हजार रुपये व मोबाईल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. अशा परिस्थितीत मदतीऐवजी टाळूवरचे लोणी खाणारे महाभाग निघाले.

रुग्णवाहिकेतच पती-पत्नीचा मृत्यू
ज्या रुग्ण वाहिकेमध्ये थोरल्या बहिणीचा मृतदेह घेऊन जात होते, त्याच रुग्णवाहिकेतून धाकटी बहीण व तिच्या पतीला ‘घाटी’त नेण्यात आले. तेथे जाण्यापूर्वीच या रुग्णवाहिकेत पती-पत्नीचा मृत्यू झाला. तेथे उत्तरीय तपासणी करून पती-पत्नीचा मृतदेह मुंबईला नेण्यात आला. या घटनेने उपस्थितांची मने हेलावली.

Web Title: aurangabad marathwada news couple death in accident