आजपासून अकराशे बेकायदा धार्मिक स्थळांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

महापालिकेची चार पथके स्थापन - पोलिस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात

औरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या पाडापाडीला बुधवारपासून (ता. २६) सुरवात करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी महापालिका प्रशासनाने चार पथके तैनात केली असून, प्रत्येक पथकात प्रमुखांसोबत ११ कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मंगळवारी (ता.२५) पत्रकारांना दिली.

शहरातील शासकीय, सार्वजनिक जागांवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच आदेशित केले आहे. या आदेशाची माहिती जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, एमआयडीसी, एमएसआरडीसी, वक्‍फ बोर्ड, सिडको यांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात मंगळवारी (ता. २५) झालेल्या बैठकीत श्री. मुगळीकर यांनी ही माहिती दिली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना श्री. मुगळीकर म्हणाले, ‘‘ महापालिकेने यापूर्वी दीड वर्षांपूर्वी शहरातील बाराशे चौऱ्यान्नव धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यात शहरातील समारे सर्वच धार्मिक स्थळांचा समावेश होता. त्यावर नागरिक, लोकप्रतिनिधींकडून काही धार्मिक स्थळांबाबत आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने सुधारित यादी प्रसिद्ध केली असून, त्यात एक हजार १०१ अनधिकृत, बेकायदा धार्मिक स्थळांचा समावेश आहे.

सदर अनधिकृत धार्मिक स्थळ निष्काषित करण्याची कारवाई ताबडतोब सुरू करण्याचे आणि टप्पानिहाय अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार बुधवारपासून (ता. २६) ही कारवाई हाती घेण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून, ही कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी लागेल तेवढा पोलिस बदोबस्त देण्याचे पोलिस प्रशासनाने याआधीच स्पष्ट केले आहे. कारवाईदरम्यान हा बंदोबस्त घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

कारवाईविषयी गोपनीयता
महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत धार्मिक स्थळांच्या कारवाईचे नियोजन जवळपास पूर्ण झालेले आहे; परंतु कुठल्या अनधिकृत धार्मिक स्थळापासून आणि केव्हा कारवाईला सुरवात होणार याची गुप्तता प्रशासनाकडून पाळण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारासच ही कारवाई हाती घेण्याची शक्‍यता आहे.

Web Title: aurangabad marathwada news crime on 1100 illegal religious