नवरा मारायचा थांबेना; पोलिस तक्रार घेईनात!

नवरा मारायचा थांबेना; पोलिस तक्रार घेईनात!

सासरच्या अत्याचाराने पीडित परिचारिका दोन दिवसांपासून घाटीत

औरंगाबाद - प्रेमविवाह मान्य नसल्याने सातत्याने सासरच्या लोकांकडून छळ सहन करणाऱ्या परिचारिकेला पोलिसांनी मदत केली नाही. दरम्यान, ज्याच्यासोबत जीवन-मरणाच्या शपथा घेतल्या तो नवराही पोलिसांत गेले म्हणून मारायचा थांबत नव्हता. एवढे सारे होऊनही पोलिसांनी तक्रार घेतली नाही, अशी आपबिती परिचारिका प्राची राजभोज यांनी ‘सकाळ’ला सांगितली. 

प्राची आणि सिद्धार्थ राजभोज यांनी दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. प्राची या घाटीत परिचारिका आहेत. पण त्यांचा प्रेमविवाह मान्य नसल्याने सासरच्या लोकांकडून जाच होत आहे. त्यात आता पतीही सहभागी झाला आहे. परगावची (मुंबई) मुलगी आहे, ही आपले काय बिघडवणार, या आविर्भावात पती सिद्धार्थ, सासू लंकावती आणि सासरे शंभुदेव राजभोज हे आपल्याला मारहाण करतात. शिवाय घाणीत, कचऱ्यात राहायला लावतात, प्रसंगी घरातील खाद्यपदार्थ लपवून उपाशीही ठेवतात. लहानसहान कारणांवरून भांडणे करतात, असा आरोप प्राची यांनी केला. मुलाचे दप्तर आवरण्यावरून बुधवारी (ता.१९) त्यांना नवऱ्याने भांडणानंतर घराबाहेर काढले. रात्री साडेआठला पोलिसांनी परत घरी जाण्याचा सल्ला दिला. पण, जे मारहाण करतात त्यांच्याकडे जाण्याचे आपले धाडस झाले नसल्याने पोलिसांना सोबत घरी येण्याची विनंती केली. पोलिस सोबत न आल्याने आपण मैत्रिणीकडे राहिलो. पण, मुलांच्या ओढीने शुक्रवारी (ता.२१) घरी परतलो. मात्र, घरी गेल्यानंतर पोलिसांकडे गेले म्हणून नवऱ्याने रात्री दीड वाजता चार तास बेदम मारहाण केली. तसेच मोबाईलमधील सीमकार्ड आणि एटीएम कार्डही काढून घेतले. रात्री फोन नसल्याने मदत मागता आली नाही. सकाळी किंचाळून लोक गोळा केले आणि परत पोलिस ठाण्यात धाव घेतली, असे प्राची यांनी सांगितले. याबाबत बेगमपुरा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता या प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

जखमी अवस्थेत पायी पाठवले रुग्णालयात 
मारहाणीनंतर प्राची यांचा पतीही बेगमपुरा पोलिस ठाण्यात आला. त्यावर पोलिसांनी आपल्याला घाटीत जाण्यास सांगितले. दवाखान्यात जाण्यासाठी महिला पोलिस सोबत देण्याची मागणी केली असता कर्मचारी असतानाही त्यांनी सहकार्य केले नाही. जवळ पैसे नसतानाही रिक्षाने घाटीत जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिल्याने आपण पायीच घाटीच्या दिशेने निघालो असल्याचे प्राची यांनी सांगितले. दरम्यान, रस्त्यात मकाई गेट येथेच बेशुद्ध पडले. त्यानंतर आपल्याला थेट दवाखान्यात शुद्ध आली आणि येथे नवऱ्याने आणून सोडल्याचे सांगण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या डोक्‍याला मार, अंगावर व्रण, सूज आहे. मात्र, पोलिसांनी आपल्याकडे ढुंकूनही पाहिले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com