चार अतिक्रमणे जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - जयभवानीनगरात नाला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने अखेर कारवाई सुरू केली असून, बुधवारी (ता. आठ) चार इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. नागरिकांच्या किरकोळ विरोधानंतर पोलिस बंदोबस्तात ही अतिक्रमणे काढण्यात आली. गुरुवारीही (ता. नऊ) कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

औरंगाबाद - जयभवानीनगरात नाला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने अखेर कारवाई सुरू केली असून, बुधवारी (ता. आठ) चार इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. नागरिकांच्या किरकोळ विरोधानंतर पोलिस बंदोबस्तात ही अतिक्रमणे काढण्यात आली. गुरुवारीही (ता. नऊ) कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

जयभवानीनगर परिसरातून जाणाऱ्या नाल्यावर अनेकांनी अतिक्रमणे करून दोन-तीन मजली इमारती उभारल्या आहेत. महापालिका या नाल्यातून भूमिगत गटार योजनेअंतर्गत मुख्य मलजल निस्सारण वाहिनी टाकणार आहे. मात्र या अतिक्रमणांमुळे गटार योजनेचे काम रखडले आहे. तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासही अतिक्रमणांचा अडथळा होता. सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात जयभवानीनगरसह परिसरातील शेकडो घरांत यामुळे पाणी घुसून हाहाकार उडाला होता. त्यानंतर पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली व नाल्यावर असलेली १३३ अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

दरम्यान, पावसाळा व त्यानंतर दसरा, दिवाळीचा सण असल्यामुळे महापालिकेने कारवाई पुढे ढकलली होती. त्यात बुधवारी सकाळी बाराला पदनिर्देशित अधिकारी सी. एम. अभंग यांच्यासह प्रभाकर पाठक, इमारत निरीक्षक गंगाधर भांगे, पोपटराव तिवटने यांचे पथक जयभवानीनगरातील जिजामाता कॉलनी भागात पोचले. पोलिस, जेसीबीसह दाखल झालेले पथक पाहून नागरिकांमध्ये खळबळ उडाली. काही जणांनी आम्हाला वेळ देण्यात यावा, अशी मागणी करत विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोध डावलून पथकाने फक्त संसारोपयोगी साहित्य काढून घेण्यासाठी वेळ देत कारवाई सुरू केली. सायंकाळपर्यंत चार अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारीही कारवाई सुरूच राहणार आहे.

पोलिस उपनिरीक्षकाचेच अतिक्रमण 
जिजामाता कॉलनीच्या पुढे सिडकोची घरे असून, सिडकोने नाल्याला संरक्षण भिंत बांधली आहे. या संरक्षण भिंतीवरच एका पोलिस उपनिरीक्षकाने भिंत बांधून अतिक्रमण केले होते. महापालिकेच्या पथकाने हे अतिक्रमण जमीनदोस्त केले. तसेच नाल्यावर बांधण्यात आलेले एक घर व इतर बाधित अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे श्री. अभंग यांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news crime on encroachment