देशी दारूच्या आठ ते दहा दुकानांवर येणार टाच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - नागरिकांसाठी त्रासदायक, कायदा व सुव्यवस्थेला हानी पोचवणाऱ्या शहरातील आठ ते दहा दारूच्या दुकानांवर पुन्हा टाच येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेषत: याची सुरवात वाळूज परिसरातून झाली असून येथील एका दुकानाला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी टाळेही लावले.

औरंगाबाद - नागरिकांसाठी त्रासदायक, कायदा व सुव्यवस्थेला हानी पोचवणाऱ्या शहरातील आठ ते दहा दारूच्या दुकानांवर पुन्हा टाच येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेषत: याची सुरवात वाळूज परिसरातून झाली असून येथील एका दुकानाला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी टाळेही लावले.

देशी दारू दुकानांवर सरसकट बंदी घालण्याचे अधिकार पोलिस विभागाकडे नाहीत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून निर्देश यावे लागतात. असे असले तरीही शहर पोलिस आयुक्तांना एक महिन्यासाठी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देता येतात. याचा वापर करून आयुक्तांमार्फत सुमारे आठ ते दहा दारूची दुकाने येत्या काही दिवसांतच बंद ठेवण्याचे आदेश दिले जाणार आहेत. अवैध दारूविक्रीच्या कारवाया शहर पोलिसांकडून झाल्या. त्यात अनेकांची चौकशीही झाली. वारंवार या संशयित किरकोळ विक्रेत्यांना देशी दारू दुकानदार नियमभंग करुन दारूची विक्री करतात. याचा परिणाम नागरी जीवनावर होतो. 

मद्यपींचा त्रास, त्यांच्याकडून नशेत होणारा गोंधळ, छेडछाड, मारहाणीचे प्रकार यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्‍नही निर्माण होतात. अशा दुकानांवर कारवाई म्हणून एका महिन्यासाठी दुकान बंद करण्याच्या हालचाली पोलिस विभागाकडून सुरु आहेत. त्यातील काहींची यादी पोलिस ठाणे स्तरावरुन मागवण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

कारवाईत पकडलेल्यांकडून माहिती
देशी दारूच्या कारवाया करुन शहर पोलिसांनी संशयितांची चौकशी केली. यात ज्या दुकानांवरुन ते दारू खरेदी करीत होते त्याच दुकानांची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली. यातील बहुतांश दुकाने नागरिकांसाठी व कायदा सुव्यवस्थेसाठी त्रासदायक असून अशा दुकानांना येत्या काही दिवसांतच सील ठोकले जाणार आहे.

नागरिकांच्या तक्रारीनंतर कारवाई
एमआयडीसी वाळूज हद्दीतील घाणेगाव (ता. गंगापूर) येथील देशी दारूच्या दुकानाविरुद्ध त्रस्त नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. येथे येणाऱ्या मद्यपींकडून छेडछाड, सार्वजनिक ठिकाणी वादंग तसेच बीभत्स वर्तन सुरु होते. ठाण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांनी वरिष्ठांच्या निर्देशानुसार देशी दारूचे दुकान महिनाभरासाठी सील केले.

Web Title: aurangabad marathwada news crime on liquor shop