नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनावर "आपत्ती'

माधव इतबारे
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

केवळ औरंगाबाद महापालिकेकडून 'डीपीआर'चा प्रस्ताव

केवळ औरंगाबाद महापालिकेकडून 'डीपीआर'चा प्रस्ताव
औरंगाबाद - भूकंप, वादळ, पूर, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी राज्यातील महापालिका उदासीन असल्याचा प्रकार समोर आले आहे. दहा ठिकाणी विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने महापालिकांना "डीपीआर' सादर करण्याचा आदेश 2006 मध्ये दिला होता. मात्र, औरंगाबाद वगळता इतर नऊ महापालिकांना आदेशाचा विसर पडला आहे. दहा वर्षांनंतरही "डीपीआर' तयार करण्यात आले नसल्यामुळे राज्याचे "आपत्ती व्यवस्थापन' केवळ कागदावरच राहिले आहे.

मुंबईत यंदा 29 ऑगस्ट रोजी एकाच दिवसात सुमारे तीनशे मिलिमीटर पाऊस कोसळला. त्यात मुंबईसह परिसरातील 19 जणांचे बळी गेल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारने 25 जुलै 2006 मध्ये राज्यातील दहा महानगरपालिकांना विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्रासाठी "डीपीआर' (सविस्तर प्रकल्प अहवाल) सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यात नवी मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिकांचा समावेश आहे. राज्यात भूकंप, वादळे, पूर, अतिवृष्टी अशी नौसर्गिक संकटे वाढत आहेत. पुणे जिल्ह्यातील माळीण येथे दरड कोसळल्याने अख्खे गाव त्याखाली गाडले गेले होते. मात्र तरीही औरंगाबाद वगळून अन्य एकाही महापालिकेने "डीपीआर' सादर करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

औरंगाबाद महापालिकेने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे यांच्याशी या कामाबाबत करार केला होता. "यशदा'ने 11 लाख रुपये शुल्क घेऊन प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यानुसार हा प्रकल्प अहवाल मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव, प्रधान सचिव, नगर विकास विभाग, अग्निशमन सल्लागार, मुंबई यांना पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा अहवाल सादर केला आहे. 106 कोटींचा हा प्रकल्प असून, निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

अशा असतील सुविधा
आपत्ती व्यवस्थापन केंद्रात सुसज्ज इमारत, हेलिपॅड, ट्रेनिंग हॉल, लेक्‍चर हॉल, लायब्ररी, मुख्य कार्यालय, पेरड ग्राउंड, वसतिगृह, विहीर; तसेच गोडावून अशा सुविधा उपलब्ध असतील.

प्रस्तावित केंद्रे -
- नवी मुंबई - मुंबई, नवी मुंबई, उपनगर, एमसी एरिया.
- ठाणे - ठाणे, मुंबई व उपनगर.
- पुणे - पुणे, सातारा.
- सांगली - सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर.
- औरंगाबाद - औरंगाबाद, जालना, बीड.
- नाशिक - नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर.
- अमरावती - अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.
- नागपूर - नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.

Web Title: aurangabad marathwada news Disaster on Natural Disaster Management