मागे जायचे की पुढे? - काकोडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

औरंगाबाद - आपल्याला मागे जायचे की पुढे, असा सवाल अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केला. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी डार्विनचा सिद्धांत चुकीचा असल्याचे विधान येथे नुकतेच केले होते. त्यावर बोलताना डॉ. काकोडकर यांनी हा सवाल केला आणि हे विधान न नाकारता त्यावर अभ्यास व्हायला हवा, असे सूचित केले.

औरंगाबाद - आपल्याला मागे जायचे की पुढे, असा सवाल अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केला. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी डार्विनचा सिद्धांत चुकीचा असल्याचे विधान येथे नुकतेच केले होते. त्यावर बोलताना डॉ. काकोडकर यांनी हा सवाल केला आणि हे विधान न नाकारता त्यावर अभ्यास व्हायला हवा, असे सूचित केले.

येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका कार्यक्रमानंतर डॉ. काकोडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘भारताला मोठी परंपरा आहे. पारंपरिक ज्ञानाचा आवाका मोठा आहे. त्याच्या आधारावर आपण पुढे जायला हवे. माहिती ही तावून सुलाखून घेतली पाहिजे. माहितीचा अर्थ काय आहे, हे जाणून त्याचे कंगोरे तपासले जावेत. केवळ कोणी काहीतरी सांगितले म्हणून त्याला ज्ञानाचा मार्ग म्हणता येणार नाही. मुद्दा असा आहे की, आपल्याला आता पुढे जायचे की मागे, हे ठरवावे लागेल. डार्विनचा सिद्धांत आणि त्याला काही उदाहरणे आहेत. लोकांनी ते सिद्ध करून दाखवले आहेत.’

अणुशक्ती प्रकल्प आणि त्यातून होणाऱ्या ऊर्जेसाठीचा आराखडा आपण तयार केला आहे. आपल्या देशात युरेनियम कमी असल्याने ‘थ्री स्टेज’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ते तयार केले जाते. जैतापूरमध्ये फ्रान्सच्या सहकार्याने यंत्रणा उभी करायची आहे. सध्या या प्रकल्पाला विरोध होत असला तरी, तो अद्याप रद्द झालेला नाही, असे डॉ. काकोडकर म्हणाले.

आंतरराष्ट्रीय परिषद बोलावू - सत्यपालसिंह
गुवाहाटी - उत्क्रांती-बाबतच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद बोलावू, असे या मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. सत्यपालसिंह यांनी आज सांगितले. तसेच, उत्क्रांतीबाबतचा सिद्धांत खोटा असल्याच्या विधानावर ठाम असल्याचेही ते म्हणाले. 

‘माकडे हे माणसाचे पूर्वज आहेत, असे वेदशास्त्रात असे कुठेही नाही,’ असे डॉ. सिंह म्हटले होते. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धान्त त्यांनी नाकारला होता. पाठ्यपुस्तकातून डार्विनचा सिद्धान्त वगळणार का, या प्रश्‍नावर त्यांनी ‘मनुष्यबळ मंत्रालयाने पुढाकार घेतल्यास सिद्धान्ताच्या खरेपणा विषयावर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येईल. त्यानुसार या सिद्धान्ताची माहिती अभ्यासातून वगळण्यास आमची तयारी  आहे,’ असे ते म्हणाले.

Web Title: aurangabad marathwada news dr anil kakodkar talking