डॉ. दाभोलकर, पानसरेंच्या हत्येमागे सनातनच - डॉ. भारत पाटणकर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - 'डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर जे पुरावे पुढे आले त्यांचे नाव घेतले पाहिजे. तसेच गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येमागे सनातनच आहे,'' असा आरोप श्रमिक मुक्‍ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केला. तसेच गोव्याच्या आश्रमात असलेल्या मूळ सूत्रधारांना पोलिसांनी पकडावे; अन्यथा आम्हीच त्यांना पकडून न्याय मिळवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नासंदर्भात डॉ. पाटणकर यांनी आज विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेतली. तत्पूर्वी, सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ""दाभोलकर ते कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोव्यातील आश्रमातून मूळ सूत्रधार पकडावेत; अन्यथा आम्हीच आश्रमात जाऊन त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करू. कऱ्हाड येथे 15 सप्टेंबरला श्रमिक मुक्‍ती दलचा राज्यस्तरीय महामेळावा होणार आहे. गोव्याला कधी जायचे, याबाबत त्यात निर्णय घेतला जाईल. पोलिसांनी नुसते सुपाऱ्या घेणाऱ्यांना पकडू नये.''

या हत्याप्रकरणी गुप्तचर विभागास, पोलिसांना जो माग लागला तो गोव्याच्या आश्रमापर्यंत गेला होता. मग माहिती असूनही नुसते जाऊन परत का येता? आरोपी इतकी वर्षे कसे काय फरारी राहतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

'सोवळ्या'बद्दल माफी मागा!
'संस्कृतीचे गाव म्हटले जाणाऱ्या पुणे शहरात जातीच्या पायावर दुजाभाव करणे, तसेच संबंधित व्यक्‍ती या जातीची असल्याने फसवणूक झाली म्हणत तक्रार दाखल करणे, हे गंभीर आहे. आपण कितीही तंत्र, वैज्ञानिकदृष्ट्या पुढे गेलेलो असलो तरीसुद्धा सांस्कृतिक, सामाजिकदृष्ट्या अजूनही 19 व्या शतकाच्या फार पुढे गेलो नाहीत. हे दाखविणारी ही घटना आहे. धार्मिक क्षेत्रात धंदा घुसला असून, 21 व्या शतकात असे वागणे बरे नाही. धार्मिक कार्य करताना संबंधित महिलेने जात सांगितली नाही, असे म्हणणेच चुकीचे आहे. यासंबंधी तक्रार दाखल करणाऱ्या महिलेने महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे; अन्यथा राज्यात मोठे आंदोलन उभे करू,'' असा इशाराही डॉ. पाटणकर यांनी दिला.

Web Title: aurangabad marathwada news dr. dabholkar & pansare murder by sanatan