नवमाध्यमांमुळे साहित्यिक वाचकांची दरी होतेय कमी - डॉ. पृथ्वीराज तौर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - 'लेखक, कवी आणि वाचकांच्या मधली दरी नव समाजमाध्यमे कमी करत आहेत. यामुळे लिहिणारे, बोलणारे, चर्चा करणारे एकत्र येत असल्याने लोकसहभागाचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे; मात्र अभिव्यक्त होताना सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करायला हवा. नव्या पिढीकडून परिणामकारक, विवेकी, समंजस, प्रयोगशील, चिकित्सक लिखाण अपेक्षित आहे, अशी अपेक्षा साहित्यिक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी व्यक्त केली.

साहित्य काव्यगंधने व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या मदतीने मौलाना आझाद संशोधन केंद्रात शुक्रवारी (ता. 27) एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. तौर बोलत होते. उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन झाले. कार्यक्रमाला साहित्यिक डॉ. दादा गोरे, डॉ. हृषीकेश कांबळे, पवन देशपांडे, डॉ. कैलास अंभोरे, दिलीप महालिंगे, विना माच्छी, विजय गवई, हरिदास कोष्टी, शैलजा करोडे, मदन देवगावकर, उत्तरा अकोलकर, डॉ. मजिद खान, सौख्यदा देशपांडे, यशवंत गायकवाड, शीला राजपूत, सरिता नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी डॉ. गोरे म्हणाले, ""एका लिखाणावर मूल्यमापन न करता सातत्याने आत्मचिंतन करून लिहीत राहा. आपल्या साहित्याला सजवा, बाह्यरूपाप्रमाणे आंतररूपही भेदक करायला विसरू नका,'' असा सल्ला त्यांनी दिला.

कांचन वीर यांनी कवीने सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे सांगताना साहित्यिक हे व्यक्त होतात; मात्र मदतीला पुढे येत नसल्याची खंत व्यक्त केली. दरम्यान, "ओंजळ शब्द फुलांची' या कवितासंग्रहाचे व चार ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनासाठी गजेंद्र काळे, राजेश खाकरे, शशी त्रिभुवन, सुनील ससाणे, उज्ज्वला कोल्हे, मुकेश विशे, विजय वाठोरे, पूनम शेख, प्राची पाटील, के. बी. शेख, आशा डांगे, मीनाक्षी राऊत, भारती सोळुंके, अविनाश वाघमारे, बलराम मानणे यांनी पुढाकार घेतला.

मॉलप्रमाणे ग्रंथप्रदर्शनालाही सहकुटुंब जा!
आपल्याला घडवण्याचे काम साहित्य करते. त्यामुळे धन संपत्तीपेक्षा आपण आपल्या पुढच्या पिढीला साहित्याचा कोणता वारसा देतोय यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. आपण मॉलमध्ये खरेदीसाठी सहकुटुंब जातो. अगदी तसेच ग्रंथप्रदर्शनालाही जा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी धानोरकर यांनी केले.

Web Title: aurangabad marathwada news dr. prithviraj taur talking