संडे हो या मंडे, रोज लागतात अंडे!

संदीप लांडगे
गुरुवार, 11 जानेवारी 2018

औरंगाबाद - आवों सिखायें तुम्हें अंडे का फंडा, ये नहीं प्यारे कोई मामुली बंदा, या गाण्याच्या ओळीप्रमाणे थंडीचा कडाका वाढल्यामुळे दिवसेंदिवस अंड्यांच्या मागणीत वाढ होत आहे. परंतु शहरात अंडे पुरवठ्याचे सूत्र बिघडल्याने त्याचे भाव वाढले आहेत. औरंगाबादेत पाच रुपये साठ पैशांपर्यंत एका अंड्याचा दर आहे. याचा फटका रस्त्यावरील आमलेट-पाव गाडीच्या उलाढालीला बसत आहे.  

शहरात रोज पाच ते सहा लाखांपेक्षा जास्त अंड्यांचा खप होत असल्याची माहिती अंडी व्यापाऱ्यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर कमी जास्त होत असल्याने सर्वसामान्यांच्या घरातील रोजचे बजेट कोलमडत चालले आहे. भाजीपाल्याच्या तुलनेत अंडी परवडतात. याचा हिशेब करून अनेकजण भाजी कमी व अंडी खरेदीवर जास्त भर देत आहेत.

त्यामुळे शहरात अंड्यांच्या मागणीत वाढ झालेली आहे. औरंगाबादेत गंगापूर, पैठण, सिल्लोड, फुलंब्री या भागांतून अंडी येतात. मात्र शहराची गरज भागवण्यासाठी नगर, जालना, बीड, नांदेड याठिकाणाहूनही अंडी आयात होत असल्याने वाहतुकीचा खर्च वाढून साहजिकच अंड्यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून एक अंडे काही ठिकाणी साडेपाच ते सहा रुपये दराने विकले जात आहे. 

शहरात चारशे ते पाचशे हातगाड्यांवर अंड्यांचे पदार्थ मिळतात. थंडीत वाढ झाल्यामुळे अंडाभुर्जी, ऑमलेट या पदार्थांच्या विक्रीत वाढ झाली आहे. सत्तर रुपयांच्या जेवणाच्या ताटाला पर्याय म्हणून अनेक कष्टकरी व हौशीवर्ग अंडाभुर्जी व ऑमलेट-पाव खाण्याला पसंती देतो. त्यामुळे रोज एका गाड्यावर किमान दोनशेपेक्षा जास्त अंडी खरेदी होतात. अंड्यांचे दर वाढल्यामुळे पंधरा रुपयांचे आमलेट वीस रुपये, तर भुर्जीचा भाव पंचवीस रुपये झाला आहे. तर काही ठिकाणी केवळ स्पर्धा म्हणून हा भाव पाच रुपयांनी कमीच ठेवला आहे. एक वेळी हौसेने किंवा भुकेमुळे दोन भुर्जी पाव खाणाऱ्यांनी हात आखडता घेतला आहे.

दृष्टिक्षेपात.....
भाजीपाल्याचे दर कमीजास्त होत असल्याने अंड्यांच्या मागणीत वाढ
नोटाबंदीमुळे अंडी उत्पादन क्षमतेवर मर्यादा
शीतगृहात नीचांकी साठा
अंड्यांचा उत्पादन खर्च २ रुपये २० पैशांवरून २ रुपये ९० पैशांवर
प्रति अंड्यामागे १ रुपया २० पैसे ते दोन रुपये ५० पैसे नफा

Web Title: aurangabad marathwada news egg