गावोगावी पोचले आंदोलनाचे लोन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

दूध, भाजीपाला रोखला; पालेभाज्यात सोडली जनावरे

दूध, भाजीपाला रोखला; पालेभाज्यात सोडली जनावरे
औरंगाबाद - शेतकरी संपाचे लोण आता गावोगावी पोचले आहे. शहराकडे येणारा भाजीपाला, दूध शेतकरी आंदोलनकर्त्यांनी चौकाचौकांत रोखून धरले. अनेक गावांत भाजीपाला, दूध रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी शासनाच्या निषेधार्थ भाजीपाल्यात शेळ्या सोडून दिल्या, तर काहींनी भाजीवर ट्रॅक्‍टर फिरविला.

शेतकरी संप दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. दोन) तीव्र झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांनी भाजीपाला, टोमॅटो, कांदे, लसूण, दूध रस्त्यावर फेकून दिला आहे.

ग्रामस्थांनाच वाटले दूध
आडगाव येथील शेतकऱ्यांनी संपाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी दूध रस्त्यावर सांडले होते. दुसऱ्या दिवशी मात्र, शेतकऱ्यांनी दूध फेकून न देता घरोघरी वाटून दिले. आंदोलन सुरू असेपर्यंत दररोज गावातच दूध वाटप करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. एवढेच नाही तर गावातील जे शेतकरी चिकलठाणा येथे भरणाऱ्या बाजारात भाजीपाला, फळे घेऊन जातात त्यांनीही बाजारात माल न नेणेच पसंत केले.

Web Title: aurangabad marathwada news farmer strike