आदर्शांचा वारसा देणारे ‘वडील’ कुटुंब

आदर्शांचा वारसा देणारे ‘वडील’ कुटुंब

पितृऋण जपणाऱ्या सराफ्यातील पुरवारांची कथा

औरंगाबाद - वडिलांकडून कुणाला उद्योगाचा वसा मिळतो, तर कुणाला व्यवसायाचा वारसा; पण देशप्रेम आणि समाजऋण जपण्याचा वारसा सलग चार पिढ्या पुढीलांना देणारे घराणे औरंगाबादेत आहे. सराफ्यातील पुरवार घराण्यातील तीन वडिलांनी पुढच्या पिढ्यांना कला, संस्कृती, देशभक्ती आणि इतिहासनिष्ठेचा वारसा दिला. आता चौथी पिढी हे संचित जपताना शहराच्या समृद्धीत भर घालण्याचे काम निष्ठेने करत आहे.

स्वातंत्र्यसैनिकांचे मित्र जानकीलाल
मूळचे मध्य भारतातील पुरवार घराणे सुमारे तीन-चारशे वर्षांपूर्वी औरंगाबादेत आले. निजाम प्रांतात उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यलढ्यात या घराण्यातील जानकीलाल पुरवार यांचे मोठे योगदान राहिले. परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांशी त्यांची जवळीक होती. त्यांच्या वाड्यातील तळघरात असलेल्या आखाड्यात सगळे जमत असत. यातच हुतात्मा अनंत कान्हेरे यांना क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली. मराठवाडा मुक्तिसंग्रामात रझाकार आणि निजामाच्या पोलिसांनी हर्सूल कारागृहात डांबलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना डबे पुरवण्यापासून त्यांचे संदेश बाहेर स्टेट काँग्रेसच्या नेत्यांना देण्यापर्यंत अनेक कामांत ते अग्रेसर राहिले.

अष्टपैलू डॉ. शंकरलाल
वैद्यकशास्त्रात पदवी मिळवलेले त्यांचे सुपुत्र डॉ. शंकरलाल पुरवार हे १९४५ मध्ये निजाम प्रांतीय व्यायाम परिषदेचे स्वागताध्यक्ष होते. ते उत्तम कवी तर होतेच; शिवाय त्या काळात महाराष्ट्रातील नावाजलेल्या साहित्यिकांशी त्यांचे उत्तम संबंध असल्याचे पत्रव्यवहारांतून दिसून येते. ऑल हैदराबाद फिजिकल एज्युकेशन कॉन्फरन्सचे ते सदस्य राहिले. सार्वजनिक गणेशोत्सवांत शहरात त्यांचा श्री गणेश भक्त मेळा आणि जय हिंद गणेश मंडळ प्रसिद्ध होते. या मेळ्यात गाण्यासाठी त्यांनी पदे लिहिली. त्यांतून देशभक्तीची भावना जागृत करण्याचे मोठे काम केले. शहरातील नाट्य चळवळीतही सक्रिय असलेल्या डॉ. शंकरलाल यांनी कचरदास बाकलीवाल, सतीश महाजन, धनराज सेठी यांच्या सहकार्याने ‘अभिनव नाट्य, औरंगाबाद’ ही संस्था स्थापन केली. त्यांच्या नाट्यप्रयोगांत कुसुमताई जोशी, शांतादेवी सदावर्ते, श्रीकांत सदावर्ते, त्र्यंबक महाजन, पुरुषोत्तमदास हौजवाला, वसंतराव हरसूलकर, पुंडलिकराव रांजणगावकर, नाथप्रसाद दीक्षित, नारायणदास श्रॉफ, बाबूराव महाजन आदी मंडळी उत्साहाने सहभागी होत. त्याशिवाय ते सर्वोदय आश्रमाचे चिटणीस, जिल्हा कुष्ठनिवारक मंडळाचे उपाध्यक्ष, औरंगाबाद आर्ट सोसायटीचे अध्यक्ष होते.

डॉ. शांतीलाल यांचे इतिहासप्रेम

पेशाने डॉक्‍टर असलेल्या या अवलियाने देशातून तस्करीमुळे बाहेर जाणाऱ्या १७ हजार पुराणवस्तू जमवून स्वतःच एक इतिहास रचला. संवेदनशील चित्रकार आणि शिल्पकार असलेल्या डॉक्‍टरांना १९६५ मध्ये डोळ्याला इजा झाल्यामुळे चित्रकला थांबवावी लागली. मग त्यांचे लक्ष वळले ते इतिहासाच्या जागोजाग विखुरलेल्या अनमोल रत्नांकडे! नष्ट होणाऱ्या, छुपी विक्री सुरू असलेल्या पुराणवस्तूंचे पदरमोड करून पालकत्व घेण्यास सुरवात केली आणि संग्रहालयाच्या माध्यमातून नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून दिली. सातवाहन, देवगिरीच्या यादवांपासून शिवकालीन इतिहासापर्यंत बरीच नवी माहिती समोर आली. महापालिकेने सुरू केलेल्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाला त्यांनी साडेतीन हजार वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. पुरातत्त्व विभागाच्या सल्लागार समितीचे ते सदस्यही राहिले. आईच्या नावे त्यांनी सुरू केलेल्या मातोश्री कौशल्या पुरवार पुराणवस्तू संग्रहालयास दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती झैलसिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.

मुले जपताहेत वारशाचा वसा

चार दशकांच्या अथक परिश्रमांतून उभारलेल्या मातोश्री कौशल्या पुरवार पुराणवस्तू संग्रहालयासाठी स्वतंत्र इमारत असावी, अशी डॉ. शांतीलाल पुरवार यांची अखेरची इच्छा होती. अनेक थोरामोठ्यांनी आश्वासने दिली; पण त्यांच्या हयातीत भव्य संग्रहालयाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. सुमारे १७ हजार पुराणवस्तूंचा हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी आता त्यांची मुले श्रीप्रकाश, जयेश आणि ओम प्रयत्नरत आहेत. मातोश्री कौशल्या पुरवार पुराणवस्तू संग्रहालयाची स्वतंत्र ओळख या तिघा भावांनी जपली आहे.

जुन्या वाड्यातील खोल्यांत रचलेल्या या संग्रहालयासाठी त्यांनी घराच्याच जागेत मोठे दालन उभारले आहे. वडिलांच्या बरोबर सावलीसारखे राहिलेले ज्येष्ठ चिरंजीव श्रीप्रकाश हेदेखील उत्तम संग्राहक आहेत. संग्रहालयातील प्रत्येक वस्तूवर त्यांचे प्रेम आहे. महापालिकेच्या छत्रपत्री शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयात ठेवलेल्या सुमारे तीन हजार वस्तूंची ते आजही काळजी घेतात; तर ‘विश्‍वास ज्वेलर्स’ म्हणून सराफा व्यवसायात नाव कमावलेले जयेश आणि ओम हेदेखील घरातील संग्रहालयाच्या उभारणीत जातीने लक्ष घालतात.

जिद्द, संघर्ष आणि सर्जनाचे दुसरे नाव म्हणजे आमचे बाबा
बाबा भांड माझे वडील. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच होती. आज आदर्श शिक्षक, प्रकाशक आणि साहित्यिक म्हणून त्यांचा परिचय आहे; पण हा प्रवास सहज नाही. या मागे त्यांचा खूप मोठा संघर्ष आहे. जिद्द आहे. नव्हे जिद्द, संघर्ष आणि सर्जनाचे दुसरे नाव म्हणजे आमचे बाबा. वर्ष १९७० मध्ये बाबांनी ‘लागे बांधे’ हे पहिले पुस्तक लिहिले. त्याच्या प्रकाशनासाठी त्यांनी पुणे-मुंबईच्या प्रकाशकांकडे चकरा मारल्या; मात्र कोणीही प्रकाशनासाठी तयार झाले नाही. तेव्हा बाबांचे गुरू भालचंद्र नेमाडे म्हणाले, ‘‘तूच तुझ्या पुस्तकाचा प्रकाशक हो!’’ झालं. हा गुरुमंत्र घेऊन एका शिक्षकाने प्रकाशन विश्‍वात पाऊल ठेवले. १९७४ मध्ये ‘धारा’चा जन्म झाला. तेव्हा त्यांनी धारा प्रकाशन सुरू केले. या अंतर्गत त्यांनी आपले पहिले पुस्तक प्रकाशित केले. पुढे १९८० ला माझा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी ‘साकेत’ प्रकाशन सुरू केले. या काळात त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. आईवर घरखर्चाची जबाबदारी आली. आज ‘साकेत’ प्रकाशनाची महती सांगायला नको. या माध्यमातून बाबांनी नवलेखकांना लिहिते केले. त्यांना व्यासपीठ दिले. एवढेच नाही तर या क्षेत्रात पुणे-मुंबईच्या व्यावसायिकांची मक्तेदारी मोडीत काढली. त्यांच्यासोबत माझे वडील मुलाचेच नाही तर ते माझे सर्वांत बेस्ट फ्रेण्ड आहेत. 
- साकेत बाबा भांड (शब्दांकन - प्रकाश बनकर)

आमचे बाबा संस्कारांची शिदोरीच
आयुष्यात प्रत्येकाचे महत्व वेगवेगळे असते. मुलांवर खऱ्या अर्थाने संस्कार करीत घडविण्याचे काम आई करीत असते. तर वडिलांच्या वागणुकीतून मुले शिकत असतात. कळत नकळत मुलांवर वडीलांच्या वागणुकीचा परिणाम होतोच. माझ्याही जीवनावर वडिलांचा (माजी खासदार बाळासाहेब पवार) मोठा प्रभाव पडलेला आहे. समाजकारण, राजकारणात वावरत असताना त्यांनी स्वाभिमानाने घेतलेले निर्णय समाजातील अनेक प्रश्‍न सोडविण्यास कामी आले. आपण संकटात लोकांच्या कामी यायला हवे, या भावनेतून ते सतत प्रयत्नशील असत. हे करीत असताना त्यांनी कायम नीतिमूल्य जपली, याचा माझ्यावर प्रभाव पडलेला आहे. आम्ही भावंडं वेगळ्या क्षेत्रांत, व्यवसायांत असलो तरी त्यांच्या शिकवणीमुळेच बऱ्यापैकी नाव कमवू शकलो. सहकार, शिक्षण, यासह सामाजिक क्षेत्रात मोठ्या संस्था उभ्या केल्या; मात्र वडिलांच्या काही राहून गेलेल्या गोष्टी पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. ते काम मी पूर्ण करू शकलो, ही माझ्या आयुष्यातली सर्वात आनंदाची, अविस्मरणीय बाब आहे. वडीलांचे कार्य हेच सतत प्रेरणा देणारे ठरले. पदोपदी त्यांची आठवण येते. एकही दिवस त्यांच्या आठवणींविना जात नाही. त्यांच्या शिकवणीमुळेच आलेल्या आव्हानांना आम्ही सहज तोंड देऊ शकलो. त्यांनी गाजवलेले कर्तृत्व, त्यांची उंची आम्ही गाठू शकणार नाहीत; मात्र त्यांनी चालायला शिकविलेल्या रस्त्यावर चालणे सुकर झाले. त्यानुसार वाटचाल करीत असून चांगले संस्कारी जीवन जगत आहोत. आईचे संस्कार, वडीलांची शिकवण पावलोपावली जपत वाटचाल करीत आहोत. 
- मानसिंग पवार, उद्योगपती (शब्दांकन - राजेभाऊ मोगल)

वडिलांनी दिला ज्ञानदानाचा वसा

शिक्षण कमी, हलाखीची परिस्थिती, त्यातच घराची जबाबदारी... या सगळ्यांत शिक्षणाचे महत्त्व त्यांनी लहानपणीच जाणले. ते म्हणतात, ‘माणूस घडविणे हे केवळ बोलण्यापुरते ठीक आहे; मात्र स्वतः घडून इतरांना घडविणे हे खरे जगणे होय.’ त्यांचे नाव प्रभुलाल तोनगिरे.

जिल्हा परिषद शाळेतून निवृत्तीनंतर आजही तोनगिरे गुरुजी हे नाव आदराने घेतले जाते. शाळेत त्यांच्या शिस्तीचा जितका दरारा, तिततेच ते विद्यार्थिप्रिय. भडकलगेटच्या तत्कालीन मल्टीपर्पज शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. सकाळच्या वेळेत वीटभट्टीवर काम करून दुपारच्या वेळेत पदमपुरा येथून शाळेत ते चालत जात. यातूनच आपण जगण्याचा पहिला धडा घेतल्याची भावना ते व्यक्त करतात.  

वडिलांचा शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या त्यांच्या कन्या सुमित्रा सांगतात, ‘‘बाबांचे कष्ट आणि शिकविण्याची तळमळ यातून आपणाला शिक्षणाचे महत्त्व कळले. मी शिक्षण घ्यावे ही बाबांची इच्छा. मीही शिक्षिका व्हायचे ठरविले होतेच. तेव्हा मुली फार-फार तर दहावीपर्यंत शिकायच्या. बाबांनी डीएडचे शिक्षण घेताना घरखर्च कमी करत माझी फीस भरली. त्यांचा वारसा जपल्याचे स्वप्न साकार झाल्याची भावना आजही बापलेकीच्या नात्याला उजाळा देते.’’ तोनगिरे गुरुजींनंतर ‘तोनगिरे मॅडम’ या नावाने सुमित्रा यांना ओळखले जाते. त्या जिल्हा परिषदेच्या शरणापूर येथील शाळेत २१ वर्षांपासून कार्यरत आहेत.

पंच्याहत्तरीतही छंदोपासना
तोनगिरे गुरुजी आज ७५ वर्षांचे आहेत. या वयातही ‘कलगीतुऱ्या’चा छंद त्यांनी तितक्‍याच नेटाने जोपासला आहे. लोप पावत चाललेल्या कलगीतुऱ्याला ऊर्जितावस्था देण्यासाठी ‘कलगीतुरा पार्टी’ तयार करणे, स्पर्धा भरविणे अशा कार्यांत तब्बल २५ वर्षांपासून गुरुजी अग्रेसर आहेत.
- सुमित्रा प्रभुलाल तोनगिरे (शब्दांकन - सुषेन जाधव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com