तीन हजार टन सुका कचरा शहरात पडून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

आज पदाधिकाऱ्यांचा ‘कचरादौरा’
कचराकोंडीच्या सद्यःस्थितीचा आढावा महापौर नंदकुमार घोडेले पुन्हा एकदा घेणार आहेत. रविवारी (ता. एक) सकाळपासून त्यांचा कचरादौरा सुरू होईल. शहरातील कचऱ्याचे सॉर्टिंग शेड व पीट कंपोस्टिंगच्या प्रकल्पांना आठ ठिकाणी ते भेट देणार आहेत. यामध्ये एन-१२, एन-५ कम्युनिटी सेंटर, प्रभाग सहामधील कंपोस्टिंग सेंटर, पुंडलिकनगर येथील पाण्याची टाकी आणि कंपोस्टिंग पीट सेंटर, सेंट्रल नाका येथील सॉर्टिंग सेंटर, रमानगर स्मशानभूमी आणि तेथील कंपोस्टिंग पीट सेंटर, शहागंज भाजीमंडईचा समावेश आहे.

औरंगाबाद - शहरात निघणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जात असली तरी सुक्‍या कचऱ्याचे करायचे काय, याचे उत्तर प्रशासनाला अद्याप मिळालेले नाही. सध्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल तीन हजार टन कचरा गोण्यांमध्ये भरून साठविण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कचराकोंडीनंतर महापालिकेने ओला व सुका कचरा वेगळा जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास शंभरहून अधिक वॉर्डांमध्ये अशा पद्धतीने ओला आणि सुका कचरा वेगवेगळा मिळत असल्याने ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोपे झाले आहे. घनकचरा विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी विक्रम मांडुरके यांनी सांगितले, की सद्यःस्थितीत शहरात १०० ठिकाणी जमिनीत खड्डे करून तिथे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. प्रभाग क्रमांक एक आणि दोन या भागांत काही ठिकाणी जागेची अडचण आहे. तथापि, ओल्या कचऱ्याचा प्रश्‍न नियंत्रणात आला आहे. सध्या बारा ठिकाणी जमिनीवर सिमेंटचे कंपोस्ट पीट बनविण्यात येत आहे. हडको एन १२, औरंगपुरा भाजी मंडई, सेंट्रल नाका आदी ठिकाणी ही कामे सुरू आहेत. कचरा वेचकांच्या मदतीने दररोज जमा होणारा सुका कचरा गोण्यांमध्ये भरून ठेवण्यात येत आहे. सद्यःस्थितीत शहरात सेंट्रल नाक्‍यासह विविध ठिकाणी सुमारे तीन हजार मेट्रिक टन कचरा गोण्यांमध्ये पडून आहे. या कचऱ्याचे काय करायचे, असा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे. दरम्यान, एका सिमेंट कंपनीला काही कचरा देण्यात आला होता. त्यानंतर मागणी येत नसल्याने प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

Web Title: aurangabad marathwada news garbage issue