कचरा प्रक्रिया मशीनच्या निविदा रखडल्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

औरंगाबाद - कचऱ्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनाच्या ८९ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दहा कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे; मात्र अजूनही या आराखड्यास तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. परिणामी, २७ मशीन खरेदीची निविदा प्रक्रियाही रखडली आहे. मशीन खरेदीच्या निविदा प्रसिद्ध होण्यास आणखी दोन ते तीन दिवस लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नागरिकांच्या विरोधामुळे नारेगाव-मांडकी येथील कचरा डेपो १६ फेब्रुवारीपासून बंद झाला आहे. त्यामुळे शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य शासनाने ८९ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला. हा निधी शासनाकडून अनुदान स्वरूपात देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्यानुसार १० कोटी रुपयांचा निधी काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या खात्यावर जमा झाला आहे. शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार पुढील वर्षात ३०० टन क्षमतेचा गॅस निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच प्रत्येक प्रभागात प्रत्येकी एक बेलिंग, एक ग्रेडिंग आणि एक स्क्रीनिंग अशा २७ मशीन बसविल्या जाणार आहेत.

या मशीन तातडीने बसवायच्या आहेत. त्यामुळे या मशीन खरेदीच्या निविदा तातडीने प्रसिद्ध करण्याचे आदेश प्रभारी आयुक्‍त नवलकिशोर राम यांनी आठवडाभरापूर्वीच दिले होते; मात्र आता आठवडा होऊन गेला तरी या निविदा प्रसिद्ध झालेल्या नाहीत. 

प्राप्त माहितीनुसार, मागील आठवडाभरापूर्वी महापालिकेतील अधिकारी या निविदांची कागदपत्रे तयार करण्याचे काम करीत आहेत. ती पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा अवधी लागणार आहे. दुसरीकडे शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यास अद्याप तांत्रिक मान्यता मिळणे बाकी आहे. ही तांत्रिक मान्यता महाराष्ट्र जीवन विकास प्राधिकरण कार्यालयाकडून मिळते. त्यासाठीही महापालिकेने हा आराखडा सुधारणांसह जीवन प्राधिकरणाकडे सादर केला आहे. ही मान्यता मिळाल्याशिवाय निविदा प्रसिद्ध करता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: aurangabad marathwada news garbage process machine tender