चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कोलमडली घाटीतील रुग्णसेवा

औरंगाबाद - घाटीत संपामुळे कचरा पडून होता.
औरंगाबाद - घाटीत संपामुळे कचरा पडून होता.

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय रुग्णालयांत राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेतर्फे गुरुवारी (ता. २१) दोनदिवसीय संप पुकारण्यात आला. घाटीत अधीक्षक कार्यालयासमोर घोषणाबाजी करुन आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पहिल्या शिफ्टच्या वेळेत रुग्णालयाच्या कामकाजावर परिणाम झाला, दुपारनंतर घाटी प्रशासनाने स्वयंसेवकांच्या मदतीने परिस्थिती काहीशी नियंत्रणात आणली. दरम्यान, या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शुक्रवारीही (ता. २२) संप सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

घाटी रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची ७४४ पदे मंजूर आहेत. यापैकी ५०३ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी २३२ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. तर २० कर्मचारी रजेवर होते. घाटी रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या लघुवेतन कर्मचारी संघटना, कास्ट्राईब संघटना, इंटक संघटना, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संघटना या संघटना कार्यरत आहेत. यातील केवळ राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने हा संप पुकारला आहे. बाकी तिन्ही कर्मचारी संघटनांनी आपापल्या कर्मचारी सभासदांना कामावर रुजू राहण्याचे आवाहन केले होते. 

यासंबंधीच्या निवेदनात म्हटले, की अनुकंपा सेवाभारती विनाअट करावी, वैद्यकीय कारणास्तव अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सेवेत सामावून घ्यावे, निवृत्त कर्मचाऱ्यांना शासनसेवेत घ्या, रिक्त पदे भरा, आऊटसोर्सिंग बंद करा, अशा मागण्या करण्यात आल्या. राज्य चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेचे रवींद्र दाभाडे, सचिन पांडव, राजेश लोहाट, अफसर बानो, गजानन वाघ यांनी घाटीच्या अधिष्ठातांना निवेदन दिले. दरम्यान, शुक्रवारीही संप सुरूच राहील, असेही दाभाडे यांनी कळविले आहे. 

रात्रीच्या शिफ्टचे आणि दुसऱ्या दिवशीचे नियोजन केल्यामुळे शुक्रवारी (ता. २२) कामावर परिणाम होणार नाही, असा दावा घाटी प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. दरम्यान, प्रसूती विभागातील स्वच्छता, बायोवेस्टच्या सफाईसाठी कुणीही उपलब्ध झाले नव्हते. रुग्णांना इतरत्र हलवणे, ऑक्‍सिजन सिलिंडर लावणे अशा सर्वच कामांचा भार परिचारिका नातेवाइकांच्या मदतीने पार करताना दिसल्या. 

रुग्णालयाचे कामकाज नियंत्रणात
पहिल्या शिफ्टमध्ये ४० कर्मचारी कामावर हजर होते. इतर तीन संघटनांचे कर्मचारी संपात सहभागी न झाल्याने परिस्थिती नियंत्रणात होती.
 याशिवाय स्वयंसेवकांची फळीही मदतीसाठी तयार होती, अशी माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे दिली. दुपारी एकच्या दरम्यान अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कामाचा आढावा घेतला. महाविद्यालयातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्या म्हणाल्या.

के. के. ग्रुपच्या स्वयंसेवकांची मदत
के. के. ग्रुप, गाडगेबाबा संस्था या दोन ग्रुपचे ६० स्वयंसेवक संपकाळात रुग्णसेवा देण्यासाठी आले होते. मात्र, संपकऱ्यांनी सकाळी त्यांना रुग्णालयात प्रवेश करू दिला नाही. त्यानंतर दिवसभर अधीक्षक कार्यालयातून त्यांना फोनवर सूचना दिल्या गेल्या. त्यानुसार स्वयंसेवकांनी मदत केली.

रुग्णांची कामे खोळंबली 
अस्थिव्यंग विभागात अकरा, कान-नाक-घसा विभागात एक, स्त्रीरोग विभागात पाच, शल्यचिकित्सा विभागात सहा शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. सर्जरी आणि मेडिसीन बिल्डिंगमध्ये बायोवेस्ट आणि इतर कचऱ्याच्या पिशव्या पडून होत्या. बाह्यरुग्ण विभागात कर्मचारी नसल्याने सकाळी तीन काउंटर काही काळ उशिरा, तर चौथे काउंटर अकराला सुरु झाले. अपंग प्रमाणपत्रांसाठी आलेल्यांनाही या संपाचा फटका बसला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com