मालवाहू वाहनांचा टॅक्‍सही ऑनलाईन भरता येणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

२६ जुलैपासून होणार सुविधा सुरू ; लाभ घेण्‍याचे आवाहन

औरंगाबाद - परिवहन कार्यालयात ऑनलाईन पद्धतीच्या कामकाजाला वेग आला आहे. आता मालवाहू (गुड्‌स ट्रान्स्पोर्ट) प्रकारातील वाहनांचाही कर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

२६ जुलैपासून होणार सुविधा सुरू ; लाभ घेण्‍याचे आवाहन

औरंगाबाद - परिवहन कार्यालयात ऑनलाईन पद्धतीच्या कामकाजाला वेग आला आहे. आता मालवाहू (गुड्‌स ट्रान्स्पोर्ट) प्रकारातील वाहनांचाही कर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गेल्या वर्षभरापासून विविध उपाययोजना अवलंबिल्या आहेत. कार्यालयाने संगणकीय प्रणालीवर भर दिला आहे. राज्यातील संपूर्ण संगणकीय ऑनलाईन कार्यालय म्हणून औरंगाबाद आरटीओची ओळख झाली आहे. परिवहन कार्यालयाने वाहन परवान्यांचे ऑनलाईन प्रणालित रूपांतर केले. ई-गव्हर्नन्सबरोबर करार केलेला असल्याने फेब्रुवारीपासून दुचाकी, चारचाकी एकरकमी शुल्क भरणाही ऑनलाईन सुरू करण्यात आला आहे; मात्र माल वाहतूक (गुडस) प्रकारातील वाहनांना प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक तीन महिन्याला कर (टॅक्‍स) कार्यालयात येऊन भरावा लागत होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी कार्यालयाने संगणकीय ऑनलाईन पद्धतीमध्ये सुधारणा केली. आता साडेसात टनापेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांसाठी २६ जुलैपासून ऑनलाईन शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक तीन महिन्याला किंवा प्रत्येक वर्षाला कार्यालयात येऊन शुल्क भरणा करण्याची गरज राहिली नाही. 

इंटरनेट बॅंकिंग, डेबिट कार्ड वापरून एसबीआय, ई-पे यांद्वारे ऑनलाइन शुल्क भरणा करण्याची सुविधा www.parivahan.gov.in या पोर्टलच्या माध्यमातून देण्यात आली आहे. संबंधित वाहनमालकांनी कार्यालयात येण्याऐवजी थेट ऑनलाईन कर भरून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी केले आहे.

Web Title: aurangabad marathwada news goods carrier vehicle tax paid online