देवींच्या मूर्तींनाही ‘जीएसटी’चा फटका

संदीप लांडगे
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - नवरात्र उत्सवाला अवघा आठ दिवसांचा अवधी उरला असून, देवीची मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, जीएसटीमुळे गणपतीप्रमाणे देवीच्या मूर्तीही यावर्षी महाग होणार असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा नवरात्र साजरा करणाऱ्या मंडळांमध्ये वाढ झाली आहे. 

औरंगाबाद - नवरात्र उत्सवाला अवघा आठ दिवसांचा अवधी उरला असून, देवीची मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, जीएसटीमुळे गणपतीप्रमाणे देवीच्या मूर्तीही यावर्षी महाग होणार असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा नवरात्र साजरा करणाऱ्या मंडळांमध्ये वाढ झाली आहे. 

शहरात अनेक ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. विविध भागांत या उत्सवाची तयारी जोमात सुरू आहे. मंडळांप्रमाणेच शहरातील मूर्तिकारदेखील देवीची उत्सवमूर्ती तयार करण्यात मग्न असून, त्यांचेही काम अंतिम टप्प्यात आहे. शहरामध्ये विघ्नहर्त्या गणरायांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले जाते. दरवर्षी मूर्तिकारांकडून अंबामाता, तुळजाभवानी, दुर्गादेवी बंगाली, माहूरची रेणुका, कालिकामाता, शेरावली सिंहासन बैठक, वणीची देवी, कोल्हापूरची महालक्ष्मी मोर आसन, अशा विविध प्रकारच्या मूर्ती तयार करण्यात येतात; परंतु यावर्षी एकापाठोपाठ एक उत्सव आल्याने मूर्तिकारांना वेगवेगळ्या मूर्ती करण्यास वेळ मिळाला नाही. सध्या शहरातील पाच ते सहा मूर्तिकारांकडे फक्त दुर्गादेवीचीच मूर्ती उपलब्ध आहे. कारण देवीच्या मूर्तीला बरीच आभूषणे चढवली जातात. साडी, दागदागिने यांचे रंगकामही खूप बारकाईने करावे लागते. मूर्ती विकत घेताना महिला अगदी पारखून मूर्ती घेतात. त्यामुळे कोणतीही चूक होऊ नये म्हणून मूर्ती घडवताना जास्त वेळ लागत असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे. यंदा जीएसटीमुळे मूर्तीचे भाव वाढलेले आहेत.  सध्या मंडळांसाठी अगदी एक हजार रुपयांपासून ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत देवींच्या मूर्ती उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

दरवर्षी अंबामाता, तुळजाभवानी, दुर्गादेवी, माहूरची रेणुका, कालिकामाता, शेरावली सिंहासन बैठक, वणीची देवी, कोल्हापूरची महालक्ष्मी मोर आसन,  अशा विविध प्रकारच्या मूर्ती तयार करण्यात येतात; परंतु यावर्षी एक महिना अगोदरच नवरात्र आल्याने मूर्ती करण्यास वेळ मिळाला नाही. शिवाय यंदा ‘जीएसटी’मुळे मूर्तींच्या साहित्यांत वाढ झाल्याने दुर्गामातेचीच मूर्ती तयार केली आहे.  
- अनिता चव्हाण, मूर्तिकार

Web Title: aurangabad marathwada news GST effect on Devi Murti