आता गुरुजी, विद्यार्थी बोलणार संस्कृतमध्ये

आदित्य वाघमारे
शुक्रवार, 2 जून 2017

अभ्यासक्रमात मोठे बदल, आठवी, नववीला नवीन अभ्यासक्रम
औरंगाबाद - संस्कृत भाषेचे ज्ञान ग्रहण करण्यापेक्षा या भाषेतून संवाद व्हावा, यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आठवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल करण्यात आला. त्यामुळे आगामी काळात वर्गांमधून विद्यार्थी संस्कृत संभाषण करताना आढळले, तर आश्‍चर्य वाटायला नको.

अभ्यासक्रमात मोठे बदल, आठवी, नववीला नवीन अभ्यासक्रम
औरंगाबाद - संस्कृत भाषेचे ज्ञान ग्रहण करण्यापेक्षा या भाषेतून संवाद व्हावा, यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आठवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल करण्यात आला. त्यामुळे आगामी काळात वर्गांमधून विद्यार्थी संस्कृत संभाषण करताना आढळले, तर आश्‍चर्य वाटायला नको.

केवळ गुणवाढीसाठी संस्कृत शिकण्याचे दिवस आता संपले. भाषा समजत असली तरी या भाषेत संवाद साधणे गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांनाही सहज शक्‍य होत नाही. पूर्वी भाषा शिकण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या संस्कृत अभ्यासक्रमात आता संस्कृतमध्ये संवाद करण्याच्या उद्देशाने बदल करण्यात आले आहेत. भाषांतरावर आधारित संस्कृतच्या प्रश्‍नपत्रिकेत आता संवादावर आधारित अधिक प्रश्‍न पाहायला मिळणार आहेत. पूर्वी निम्म्या प्रश्‍नपत्रिकेत असलेल्या भाषांतराच्या प्रश्‍नांचे महत्त्व आता कमी होणार आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांत चित्रांच्या साहायाने संवाद सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे संभाषण करण्यासाठी मुलांना सोपे तंत्र उपलब्ध झाले आहे.

धड्याच्या खालीच व्याकरणाचे प्रश्‍न
भाषा शिकण्यासाठी आणि त्याचा अचूक वापर करण्यासाठी व्याकरण गरजेचे आहे. संस्कृतमध्ये त्याला मोठे महत्त्व आहे. पहिले संस्कृत भाषेचे व्याकरण शिकायचे झाले, तर पाठ्यपुस्तकात ते वेगळ्या भागात शिकवले जायचे; पण आता धडे आणि त्यालगतच त्या धड्याला अनुसरून असलेले व्याकरण देण्यात आलेले आहे.

रोजच्या संभाषणात संस्कृत येण्यासाठी...
रोजच्या संभाषणात संस्कृत येण्यासाठी या बदलांमध्ये रोज बोलल्या जाणाऱ्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. घड्याळातील वेळा, फळांची नावे, पक्ष्यांची, प्राण्यांची नावे आणि घरातील वस्तूंची नावे त्यांच्या चित्रांसहित देण्यात आली आहेत. संभाषण करताना लिंगांचा वापर कसा करावा, यासाठीही चित्रांचा आधार घेण्यात आला आहे.

असा आहे बदल
पूर्वी = आता
भाषांतराला महत्त्व : भाषांतरावरील भर घटला, संस्कृतचे शिक्षण संस्कृतमधूनच
पुस्तकात व्याकरण वेगळे : पाठासहित व्याकरण, सुलभ शिक्षण
चित्रांचा वापर नगण्य, कृष्णधवल : चित्रांच्या साहायानेच शिक्षण, संभाषण
भाषा शिक्षणावर भर : संभाषणावर भर
भांडारकर पद्धतीने संस्कृत शिक्षण : पाणिनी पद्धतीचा अवलंब.
सुभाषितांच्या साहायाने शिक्षण : पर्यावरणावरील गाणी, पोवाड्यांचा समावेश

संस्कृत समजणाऱ्या प्रत्येकालाच संस्कृतमध्ये सहज संवाद साधता येईल, असे नाही. त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. संवादासाठी चित्रांचा वापर करण्यात आला असून, त्या माध्यमातून सहज भाषा शिकता येणार आहे. व्याकरणाचे महत्त्व आहेच; परंतु संस्कृत बोलता यावे, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
- अजय निलंगेकर, सदस्य, संस्कृत अभ्यास मंडळ.

Web Title: aurangabad marathwada news headmaster & student talking in sanskrit