जनता पाण्यात, आयुक्त मुंबईत, महापौर आजारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - शहरात बुधवारी (ता. १३) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असून, चोवीस तासानंतरही शेकडो नागरिकांच्या घरांमध्ये, दुकानांत घुसलेले पाणी कायम आहे. नाल्याच्या काठावर असलेली घरे पाण्यात बुडालेली असताना महापालिका आयुक्त मुंबईत आहेत; तर महापौर भगवान घडामोडे आजारी असून, आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे.

अग्निशमन विभाग मदतकार्यात व्यस्त असल्याने शहरात झालेल्या नुकसानीची ‘ना मोज, ना दाद’ असे चित्र निर्माण झाले आहे. 

शहरात बुधवारी रात्री झालेल्या पावसाने नागरिकांची अक्षरक्षः झोप उडली. घरात साचलेल्या गुडघाभर पाण्यात रात्र काढल्यानंतर सकाळी तरी वेळेत मदत मिळेल, या आशेवर असलेल्या नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. सकाळी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर काही ठिकाणी दुपारनंतर अग्निशमन विभागाच्या गाड्या नागरिकांच्या मदतीला धावल्या. रात्री उशिरापर्यंत शहरात मदतकार्य सुरूच होते. जनता रात्रभर पाण्यात असताना आयुक्त मुंबईत आहेत; तर महापौर आजारी आहेत. त्यामुळे जनतेला वाली कोण? असा सवाल करण्यात येत आहे. अग्निशमन विभाग मदतकार्यात व्यस्त असल्यामुळे नुकसान किती झाले याची अद्याप मोजदाद झालेली नाही. दरम्यान, सायंकाळी घरांमध्ये साचलेले पाणी काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, अनेक दुकानांतील पाणी कायम होते. शुक्रवारी (ता. १५) काही ठिकाणी गाड्या पाठवाव्या लागणार असल्याची माहिती प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांनी सांगितली. 

वाहून गेलेला तरुण सापडेणा 
एमआयटी महाविद्यालयाशेजारील नाल्याच्या पुरात विनोद गंगाधर पांढरे (वय २६), बालाजी गोरखनाथ चव्हाण हे दोन तरुण वाहून गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती. त्यातील बालाजी पुरातून सुखरूप बाहेर आला. मात्र, विनोदचा अद्याप शोध लागलेला नाही. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्रीपासून शोधकार्य हाती घेतले होते. गुरुवारी सायंकाळपर्यंत शोध घेऊनही अग्निशमन विभागाला अपयश आले. पुन्हा शुक्रवारी शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती श्री. सुरे यांनी दिली. 

व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान 
शहरातील विशेषतः तळमजल्यात असलेल्या व्यापारी संकुलामध्ये पाणी घुसून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जयभवानी नगरातील चेतन मंगल कार्यालयाखालील १५ गाळ्यांमध्ये पोटमाळ्यापर्यंत पाणी साचलेले होते. त्यात हॉटेल, रुग्णालय, जनरल स्टोअर्सचा समावेश आहे. गुरुवारी दुपारपर्यंत गाळ्यांमध्ये पाणी असल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सातारा-देवळाई परिसरातदेखील चावडा व्यापारी संकुल, सिडको भागातील अनेक व्यापारी संकुलांत पाणी घुसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

Web Title: aurangabad marathwada news heavy rain