अतिवृष्टीचा इशारा, महापालिका प्रशासन सज्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - हवामान खात्याने मंगळवारपासून (ता. १९) ते गुरुवारपर्यंत (ता. २१) शहरात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. वॉर्ड कार्यालयांमधील तातडीचे मदत केंद्र; तसेच अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली. 

शहरात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस होत असून, पावसाचे पाणी तुंबण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गेल्या आठवड्यात जयभवानीनगरसह इतर ठिकाणी पावसाचे पाणी नाल्याकाठच्या घरांत घुसून हाहाकार उडाला होता. त्यानंतर पुन्हा तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासन सतर्क असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. वॉर्ड कार्यालयातील अधिकारी; तसेच अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. काही ठिकाणी आपत्कालीन कक्ष कार्यान्वित नव्हता त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

डिझेलसाठी निधीची तरतूद 
नागरिकांच्या घरात घुसलेले पाणी काढण्यासाठी अग्निशामक विभागाचे कर्मचारी डिझेलच्या पैशांची मागणी करीत असल्याचा आरोप सोमवारी (ता. १८) झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला होता. त्यावर डिझेलसाठी निधीची व्यवस्था करण्यात आली असून, यापुढे पैसे मागण्याचा प्रकार घडला तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला. 

नूर कॉलनीची पाहणी 
जयभवानीनगर नूर कॉलनी भागात सातत्याने पावसाचे पाणी घरांमध्ये घुसत असल्याचे प्रकार घडत आहेत. सोमवारी महापौरांनी नूर कॉलनीची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाहणी करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी सांगितली.

Web Title: aurangabad marathwada news heavy rain warning municipal ready