मसाल्याच्या गुणधर्मांकडे दुर्लक्ष

योगेश पायघन
मंगळवार, 23 जानेवारी 2018

मसाल्यातील घटक कोणते, गुणधर्म, शरीराला कसे उपयुक्त आहेत, हे समजून घेऊनच सेवन करावे. त्यांचे प्रमाण योग्य राखावे. मसाल्यांचा अतिवापर टाळावा.
- स्नेहा सतीश वेद, आहारतज्ज्ञ, अन्न विश्‍लेषक, औरंगाबाद

औरंगाबाद - भारतीय मसाल्याचे अन्नपदार्थ चविष्ट असतात. आपलाही मसालेदार खाण्याकडे जास्त कल असतो. टोमॅटो, काकडी, पेरू, टरबूज, सलाड यांच्यासारखे पदार्थ खातानाही त्यावर चाट मसाला पेरायला विसरत नाही. मसाल्यांमधील गुणधर्म शरीराला पोषक असले, तरी त्यांच्या अतिसेवनाने व्याधी जडतात. त्यामुळे मसाल्याच्या पदार्थांचे सेवन योग्य प्रमाणातच असले पाहिजे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. 

मसाले जितके पदार्थ स्वादिष्ट करतात तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. मसाल्यामधील ॲन्टीऑक्‍सिडंट घटक कर्करोगाचा धोका कमी करतात. म्हणूनच या मसाल्यांचा आहारात समावेश अवश्‍यक आहे; परंतु भारतीय आहारात विषेशतः महाराष्ट्रात मसाल्याची भाज्या म्हणजे तर्रीची पर्वणी समजले जाते. हिरव्या किंवा खड मिरचीचा ठेचा तर आहारात नित्याने वापरतात. त्यामुळे अल्सर, ॲसिडीटी, पाइल्सचा त्रास होण्याची शक्‍यता असते. खानदेश, मराठवाडा, विदर्भात त्याचे प्रमाण अधिक आहे, असे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्या यांनी सांगितले. 

मसाले पदार्थांतील गुणधर्म शरीराला पोषक असले, तरी अतिसेवनाने त्यांच्या गुणधर्माचा लाभ होत नाही. केवळ जिभेचे चोचले पुरविण्यासाठी त्यांचा वापर करण्याकडे कल आहे, असे अभ्यासातून समोर आले आहे. शिवाय मसाले महाग असल्याने त्यात भेसळीचे प्रमाणही वाढते आहे. अशी भेसळ आरोग्यास हानिकारक असल्याचे आहारतज्ज्ञ व अन्न विश्‍लेषक स्नेहा वेद सांगतात.

मसाल्यातील भेसळ अशीही 
मोहरीमध्ये धोतऱ्याचे बी मिसळतात. ते विषारी असते. धोतऱ्याचा दाणा एका बाजूला त्रिकोणी आणि मोहरीपेक्षा लहान असतो.

जिरे किंवा बडिशेपमध्ये गवताचे बी मिसळून त्याला कोळशाने रंगवतात. ते हातावर चोळले तर रंग लागतो. 

लवंग, दालचिनी वगैरे मसाल्याच्या पदार्थांचा अर्क काढून घेतात आणि निःसत्त्व माल बाजारात विकतात. यातील भेसळ पाण्यावर तरंगते.

लाल तिखटात अनेकदा विटकरीचा भुगा मिसळतात. हे तिखट ग्लासभर पाण्यात टाका. भेसळ वेगाने खाली जाते, मिरचीचे तिखट पाण्यावर तरंगते; ते रंग सोडत नाही. 

हळदीमध्ये मेटॅलिक यलो हा अपायकारक रंग मिसळतात. मेटॅलिन यलो पावडर असेल तर ताबडतोब रंग जांभळा होतो. हळदीमध्ये रंगीत भुसा किंवा खडूची पावडरही मिसळतात. हळदीचा अंश पाण्यात मिसळून जातो.

काळ्या मिऱ्यांमध्ये पपईच्या वाळलेल्या बिया मिसळतात. हे मिश्रण ग्लासभर पाण्यात टाकल्यास काळी मिरी खाली बसतात; पपईच्या बिया तरंगतात. पपईच्या बियांमुळे अंधत्व येऊ शकते.

Web Title: aurangabad marathwada news Ignore the properties of spices