शहरवासीयांच्या मदतीला अपुरी व्यवस्था

शहरवासीयांच्या मदतीला अपुरी व्यवस्था

आपत्कालीन मदत यंत्रणेचा भार वाहताहेत अवघे २७ कर्मचारी 

औरंगाबाद - आगीची घटना असो, इमारत कोसळलेली असो किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असेल, तर शहरातील १५ लाख लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अग्निशमन यंत्रणेकडे केवळ २७ कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे, हे मनुष्यबळ आपत्कालीन स्थितीत नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याशिवाय व्हीआयपींच्या बंदोबस्तासाठीही अग्निशमन वाहन घेऊन मागे मागे धावावे लागत आहे. वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी निकषानुसार किमान दोनशे ते सव्वादोनशे कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे विविध आपत्कालीन घटनांवेळी मदत मागितली जाते. यात आग, मदतकार्य, इमारत कोसळली, झाड पडले, पेट्रोल पंपावर काही दुर्घटना घडली, गॅस लिकेज, केमिकलच्या आगी आदी घटनांचा समावेश आहे. अशा घटनांमध्ये मदतीला जाण्याबरोबरच शहरात येणाऱ्या व्हीआयपींच्या बंदोबस्तासाठीही अग्निशमन दलाचे वाहन सतत त्यांच्याबरोबर राहते. सध्या अग्निशमन विभागाची शहरात फक्‍त तीन फायर स्टेशन आहेत. वास्तविक पाहता एक ते दीड लाख लोकसंख्येमागे एक फायरस्टेशन असावे असा नियम आहे. म्हणजेच शहरात किमान दहा फायरस्टेशनची गरज आहे. तर एका फायर स्टेशनवर तीन शिफ्टमध्ये काम करण्यासाठी उपअग्निशमन अधिकारी, प्रमुख अग्निशामक, अग्निशामक व वाहनचालक असे २१ कर्मचारी असावेत. या प्रमाणानुसार १५ लाख लोकसंख्येच्या शहरात २१० कर्मचाऱ्यांची गरज आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या तीन फायरस्टेशनशिवाय आणखी पाच फायरस्टेशन प्रस्तावित असून त्यांची निविदा प्रक्रिया सुरू झाली असली तरी लोकसंख्येच्या प्रमाणात आणखी दोन फायरस्टेशनची उणीव राहणारच आहे. सध्या अग्निशमन विभागात एकूण ८३ पदे मंजूर आहेत, त्यांपैकी ५१ पदे भरण्यात आली आहेत, तर चारपाच नव्हे तर ३२ पदे अद्याप भरलेली नाहीत. मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांना निलंबित केल्यानतंर हे पद अद्याप रिक्‍त आहे. त्यांच्या जागी स्टेशन ऑफिसर जफरखान यांना पदभार देण्यात आला होता; मात्र तेही गेल्या डिसेंबरमध्ये निवृत्त झाले. त्यामुळे त्यांचीही जागा रिक्‍त आहे. सध्या आर. के. सुरे यांच्याकडे मुख्य अग्निशमन अधिकारी पदाचा अतिरिक्‍त कार्यभार आहे. सध्या ५ उपमुख्य अग्निशमन अधिकारी आहेत. यांपैकी येत्या शुक्रवारी (ता. ३०) एकजण निवृत्त होणार आहे. ही संख्या चारवर येणार आहे. मदतीसाठी कुठूनही कॉल आल्यानंतर १ उपअग्निशमन अधिकारी, १ प्रमुख अग्निशामक, ४ अग्निशामक व १ वाहनचालक असे ७ जण एका अग्निशामक वाहनाबरोबर जावेत असा नियम आहे. मात्र, सध्या फक्‍त प्रमुख अग्निशामक, अग्निशामक व वाहनचालक एवढेच जाऊन जमेल तशी मदत करत आहेत. 
 

दहावी नापासांनाही पदोन्नती
अग्निशमन विभागात बऱ्याच काळापासून पदोन्नत्यांचा प्रश्‍न रखडलेला आहे. शासनाचा नियम आहे, की कोणत्याही पदोन्नत्या देताना किमान दहावी पास असणे आवश्‍यक आहे; मात्र या विभागात दहावी नापास असणाऱ्यांनाही एकदा नव्हे तर दोन वेळा पदोन्नती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मदतीसाठी जाणारे उपलब्ध मनुष्यबळ
उपअग्निशमन अधिकारी : ५
प्रमुख अग्निशामक : ७
फायरमन : १६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com