'एटीएम'द्वारे हेराफेरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला बेड्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - तुम्ही "एटीएम'मधून पैसे काढत असाल तर सावधान. तुमच्या पुढे-मागे "एटीएम' केंद्रात भामटे असू शकतात. कार्डाची अदलाबदल करून व तुमचा पिन मिळवून ते परस्पर पैसे काढू शकतात.

औरंगाबाद - तुम्ही "एटीएम'मधून पैसे काढत असाल तर सावधान. तुमच्या पुढे-मागे "एटीएम' केंद्रात भामटे असू शकतात. कार्डाची अदलाबदल करून व तुमचा पिन मिळवून ते परस्पर पैसे काढू शकतात.

अशाच पद्धतीने शेकडो लोकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या हरियाना, उत्तर प्रदेशच्या एका टोळीला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्यांच्याकडे विविध बॅंकांची तब्बल 70 "एटीएम' कार्ड सापडली आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक आरती सिंह यांनी दिली.
शैलेंद्र सिंह घिसाराम (वय 42, रा. दिल्ली), राजेश सतवीरसिंह (वय 25, रा. दिल्ली), बाळाराम गजेसिंह (वय 32, रा. हिस्सार, हरियाना), विनोदसिंह गजेसिंह (वय 25, रा. हिस्सार) अशी भामट्यांची नावे आहेत.

त्यांचे उत्तर प्रदेशातील दोन साथीदार पसार झाले आहेत. शहरातील रंगनाथ मस्के हे 9 सप्टेंबरला वैजापूर येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या "एटीएम'मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी कार्ड स्वाईप करूनही पैसे निघत नव्हते. त्यामुळे मागेच उभ्या असलेल्या एका भामट्याने मदतीचा बनाव केला व त्यांचे कार्ड स्वाइप करून दिले. त्यानंतर मस्के यांना पिन क्रमांक टाकण्यास सांगितले. दरम्यान, भामट्याने मस्के यांचे "एसबीआय'चे कार्ड स्वत:कडे ठेवत हुबेहुब दुसरे कार्ड त्यांच्या हाती टेकवले. या वेळेत मस्के यांचा एटीएमचा पिन भामट्याने हेरला व तो पसार झाला.

घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मस्के यांना खात्यातून 77 हजार रुपये कपात झाल्याचा संदेश आला. त्या वेळी "एटीएम' कार्ड तपासले असता, ते आपले नसल्याचे मस्के यांच्या लक्षात आले व भामट्याने कार्डाची अदलाबदल करून पैसे लांबवल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणात त्यांनी तक्रार दिल्यानंतर ग्रामीण सायबर सेलने शोध घेऊन भामट्यांना मध्य प्रदेशातून अटक केली.

सातवी उत्तीर्ण
मुख्य संशयित शैलेंद्रसिह सातवी उत्तीर्ण असून, त्याचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय होता. त्यामुळे त्याला देशभरातील स्थळांची माहिती आहे. त्याने हरियाना व उत्तर प्रदेशातील तरुणांना गोळा करून एक टोळी तयार केली. या टोळीकडे स्वत:ची मोटार असून त्याद्वारेच ते विविध राज्यांत फिरून पैसे हडपतात. या पैशांतून मौजमजा करून उरलेला पैसा उच्च राहणीमानासाठी खर्च केला जातो.

Web Title: aurangabad marathwada news interstate gang arrested