‘जायकवाडी’, ‘विष्णुपुरी’चा साठा १८ टक्‍क्‍यांवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

मराठवाड्यातील जलप्रकल्पांना प्रतीक्षा चांगल्या पावसाची

औरंगाबाद - मराठवाड्यात मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या तरी नंतर काही अपवाद वगळता पावसाची पाठच आहे. पेरणीची कामे सुरू झाली असली तरी चांगल्या, सातत्यपूर्ण, सर्वदूर पावसाची गरज आहे. सध्या काही भागात अधूनमधून तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. दुसरीकडे जलप्रकल्पांत यंदा बऱ्यापैकी साठा असला तरी काही प्रकल्प तळ गाठण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पाऊस लांबल्यास काही गावांना काटकसर किंवा टंचाईला सामोरे जाण्याची शक्‍यता निर्माण होऊ शकते.  

मराठवाड्यातील जलप्रकल्पांना प्रतीक्षा चांगल्या पावसाची

औरंगाबाद - मराठवाड्यात मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या तरी नंतर काही अपवाद वगळता पावसाची पाठच आहे. पेरणीची कामे सुरू झाली असली तरी चांगल्या, सातत्यपूर्ण, सर्वदूर पावसाची गरज आहे. सध्या काही भागात अधूनमधून तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. दुसरीकडे जलप्रकल्पांत यंदा बऱ्यापैकी साठा असला तरी काही प्रकल्प तळ गाठण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पाऊस लांबल्यास काही गावांना काटकसर किंवा टंचाईला सामोरे जाण्याची शक्‍यता निर्माण होऊ शकते.  

‘जायकवाडी’ची स्थिती
पैठण - मॉन्सूनपूर्व पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत एक टक्का वाढ झाली. त्यानंतर पाऊसच न झाल्याने स्थिती जैसे थे आहे. एक जूनला धरणात १९.३० टक्के साठा होता. वाढलेल्या एक टक्का पाण्याचा दैनंदिन वापर झाल्यामुळे सोमवारी (ता.२६) धरणात १८.७१ टक्के साठा उपलब्ध होता, अशी माहिती सहायक अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नसल्याने जलसाठ्यात वाढ झाली नसल्याचेही ते म्हणाले.

‘मांजरा’त ४५ दलघमी साठा
लातूर - लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव (ता. केज, जि. बीड) येथील मांजरा धरणात सध्या ४५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. येत्या काळात पाऊस न पडल्यास हा पाणीसाठा निव्वळ पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवावा लागणार आहे. निलंगा व औसा तालुक्‍यासाठी उपयुक्त माकणी (ता. लोहा, जि. उस्मानाबाद) येथील निम्न तेरणा प्रकल्पात ५७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. पुरेसा पाणीसाठा असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या गावांना सध्या पाण्याची चिंता नाही. जिल्ह्यातील तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरू, देवर्जन, साकोळ, घरणी व मसलगा या धरणातही एकूण १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पाऊस न झाल्यास या प्रकल्पांवरील गावांना टंचाईचा सामना करावा लागेल.

जिल्ह्यात १३२ लघुतलाव असून त्यात दहा टक्के पाणीसाठा आहे. दोन मोठ्या, आठ मध्यम व १३२ लघु तलावांत मिळून सध्या २२ टक्के पाणीसाठा असला तरी काही प्रकल्पांनी तळ गाठला आहे.  

‘विष्णुपुरी’ला दिलासा
नांदेड - जूनच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही प्रकल्पांच्या साठ्यात काहीशी वाढ झाली. मागील महिन्यात विष्णुपुरी प्रकल्पात अवघा अकरा टक्केच साठा उरला होता. सध्या तो १८ टक्के आहे. प्रकल्पनिहाय सध्याच्या पाणीसाठ्याची टक्केवारी अशी - विष्णुपुरी- १८.३३०, बाभळी- १.४४, बळेगाव- ६.१८०,  आमदूर- ४५.२२०, इसापूर-१.९१०, लोअर मानार- १५.४८०, लिंबोटी- ३७.२१०, दिग्रस- ४.८८०, सिध्देश्‍वर- ३.४०.

काही लघुप्रकल्पांत किरकोळ वाढ
परभणी - जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभीच पावसाने हजेरी लावल्यानंतर तो गायब झाला आहे. तरीही येलदरी प्रकल्प आणि नऊ लघुप्रकल्पांमध्ये किरकोळ पाणीसाठा वाढला आहे. उर्वरित जलाशयांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात २४ जूनपर्यंत ११० मिलिमीटर पाऊस झाला. तोही अनिश्‍चित, अनियमित होता. नदी, नाले, ओढे कोरडे आहेत. अद्याप जमिनीबाहेर पाणी न निघाल्याने ते जलाशयापर्यंत पोहचले नाही. २४ जूनपर्यंत मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी जलाशयाचा केवळ तीन टक्के साठा वाढला. गतवर्षी येलदरी धरणामध्ये या काळात केवळ तीस टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक होता. तूर्तास एकूण ८०९ पैकी २४९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणी असून त्याची टक्केवारी ३१ आहे. ढालेगाव बंधाऱ्यात ३८८.०८ दलघमी पाणीपातळी आहे. निम्न दुधना प्रकल्पात शंभर दशलक्ष घनमीटर (४२ टक्के), झरी (मानवत) प्रकल्पात सध्या ०.६०९ दलघमी (३७ टक्के), करपरा मध्यम प्रकल्पात ६.०४९ दलघमी (२४ टक्के), मासोळी प्रकल्पात ४.१२२ दलघमी (१५ टक्के), डिग्रस बंधाऱ्यात २.०५० दलघमी (३.२२० टक्के), मुदगल बंधाऱ्यात ०.७१० जलघमी (६.२९० टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. २२ लघुप्रकल्पांपैकी केवळ ९ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. सध्या या प्रकल्पांत ३.९४५ दलघमी (९ टक्के) उपयुक्त साठा आहे. मासोळी प्रकल्प शून्यावरच असून पाणीपातळी ४१०.३० मीटर असून सध्या ११.०६२ दलघमी तर जिवंत साठा ४.१२२ दलघमी आहे. सोनपेठ तालुक्‍यातील खडका बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे.  

‘इसापूर’मध्ये दोन टक्के साठा
हिंगोली - जिल्ह्यात मृग नक्षत्राचा पाऊस झाल्यानंतर हुलकावणी दिली आहे. इसापूर धरणाची साठवण क्षमता एक हजार २७९ दशलक्ष घनमीटर असून सध्या धरणात २५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच केवळ दोन टक्के पाणीसाठा आहे. सिध्देश्‍वर धरणाची साठवण क्षमता २५० दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त साठा शून्य टक्के आहे. मृतसाठ्यातून योजनांना पाणी दिले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news jayakwadi vishnupuri water on 18%