अट्टल कल्ल्या ऊर्फ कलीमच्या परभणीतून मुसक्‍या आवळल्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

औरंगाबाद - अट्टल चोरटा व घरफोड्या कल्ल्या ऊर्फ कलीमखान शब्बीरखान पठाण याच्या परभणी व औरंगाबाद पोलिसांनी रविवारी (ता. 28) मुसक्‍या आवळल्या. परभणीतही तो घरफोड्या करीत होता. काही महिन्यांपासून तो पसार होता. पोलिसांनी सापळा रचल्यानंतरही तो अनेकदा निसटून गेला होता.

औरंगाबाद - अट्टल चोरटा व घरफोड्या कल्ल्या ऊर्फ कलीमखान शब्बीरखान पठाण याच्या परभणी व औरंगाबाद पोलिसांनी रविवारी (ता. 28) मुसक्‍या आवळल्या. परभणीतही तो घरफोड्या करीत होता. काही महिन्यांपासून तो पसार होता. पोलिसांनी सापळा रचल्यानंतरही तो अनेकदा निसटून गेला होता.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की कलीमखान हा मूळचा जिंतूर (जि. परभणी) येथील रहिवासी आहे. तो शहरातील उस्मानपुरा, छोटा मुरलीधरनगर परिसरात राहतो. किरकोळ चोऱ्या, पाकीटमाऱ्यानंतर तो मोठ्या चोऱ्या करू लागला. गुन्हेगारीत सक्रिय झाल्यानंतरच तो अल्पावधीत अट्टल बनला. खासकरून घरफोड्या, जबरी चोऱ्या, घरात घुसून क्षणात वस्तू लंपास करण्यात तो पटाईत आहे. विशेषत: पोलिसांना मारहाण करणे, गंभीर हल्ला करून आत्महत्येचा प्रयत्नही त्याने यापूर्वी केलेला आहे.

मोबाईल चोरीच्या प्रकरणात पूर्णा येथे राहणारे रेल्वे मालगाडीचे लोको पायलट शेख खैसर शेख अहेमद चार एप्रिलला रात्री साडेनऊला मालगाडी औरंगाबादला घेऊन आले. त्यानंतर जेवण करून ते रात्री साडेअकराच्या सुमारास रेल्वेच्या रेस्ट हाऊसमध्ये सामवल बोदरा यांच्यासोबत झोपण्यासाठी गेले. ही संधी साधून अज्ञाताने त्यांचा मोबाईल चोरला होता. हाच मोबाईल कल्ल्याने चोरी केल्याची बाब समोर आली. याप्रकरणात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंदही आहे.

अलगद आला जाळ्यात
पोलिसांना सहजासहजी न पकडता येणारा कल्ल्या गुंगारा देण्यात पटाईत आहे. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार सिद्दिकी, जमादार साबळे व चौधरी परभणी येथे गेले. एरव्ही हातावर तुरी देऊन पसार होणारा कल्ल्या यावेळी मात्र सहज व अलगद पोलिसांच्या हाती लागला.

ये तो कलीमने दिया
मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात पोलिस परभणीला तपासासाठी गेले. चोरी गेलेल्या मोबाईलच्या लोकेशननुसार, पोलिस वापरकर्त्यापर्यंत पोचले. त्यावेळी मोबाईल कलीमने दिला, असे त्याने सांगितले. औरंगाबादेत धुडगूस घाणारा कल्ल्या म्हणजेच कलीम असावा, याची पोलिसांना कल्पना आली नाही; परंतु सखोल चौकशी केली त्या वेळी मात्र अट्टल कल्ल्यानेच वापरकर्त्याला मोबाईल दिल्याचे स्पष्ट झाले.

विविध पोलिस ठाण्यांत छत्तीस गुन्हे
छोटा मुरलीधरनगर येथेच कल्ल्याची जडणघडण झाली. त्याचे या भागात साथीदार असून, त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत तब्बल 36 गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिस निरीक्षक सतीश टाक यांनी सांगितले. पोलिस जेव्हा छोटा मुरलीधरनगरात त्याला पकडण्यासाठी येत, त्या वेळी त्याचे खबरे, मित्र पोलिसांच्या हालचाली त्याला सांगत. त्यामुळे गुंगारा देणे त्याला सहज जमत होते.

Web Title: aurangabad marathwada news kalimkhan pathan arrested