केशर आंब्यातून मिळविले लाखाचे उत्पादन

कमलेश जाब्रस
मंगळवार, 27 जून 2017

युवा शेतकरी बुद्धभूषण साळवे यांचा प्रयोग

माजलगाव - दुष्काळी परिस्थिती, निसर्गाचा लहरीपणा, दिवसेंदिवस खालावत चाललेली भूजलपातळी या सर्व समस्यांतून मार्ग काढत अडीच एकरांमध्ये केलेल्या केशर आंब्याच्या आमराईतून लाखाचे उत्पादन काढण्यात तालुक्‍यातील फुलेपिंपळगाव येथील युवा शेतकरी बुद्धभूषण साळवे यशस्वी झाले आहेत. 

युवा शेतकरी बुद्धभूषण साळवे यांचा प्रयोग

माजलगाव - दुष्काळी परिस्थिती, निसर्गाचा लहरीपणा, दिवसेंदिवस खालावत चाललेली भूजलपातळी या सर्व समस्यांतून मार्ग काढत अडीच एकरांमध्ये केलेल्या केशर आंब्याच्या आमराईतून लाखाचे उत्पादन काढण्यात तालुक्‍यातील फुलेपिंपळगाव येथील युवा शेतकरी बुद्धभूषण साळवे यशस्वी झाले आहेत. 

शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलेपिंपळगाव येथे बुद्धभूषण साळवे यांची ९ एकर जमीन आहे. शेतामध्ये पारंपरिक पिकांची लागवड केली जात असत. वडील पाटबंधारे विभागात नोकरीस असल्याने शिक्षण घेत शेती व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी आली. २००५ मध्ये ९ एकर शेतीपैकी अडीच एकरमध्ये केशर आंब्याच्या झाडांची लागवड ठिबक सिंचनावर केली. पाच वर्षांनंतर प्रत्यक्ष फळ येण्यास सुरवात झाली; परंतु या आंब्याची विक्री थेट व्यापाऱ्यांनाच केली जात असत. यावर्षी पहिल्यांदाच केशर आंबा झाडालाच पिकवून गावरान पद्धतीने पिकवलेला हा आंबा ग्राहकांच्या पसंतीला उतरला. ७० रुपये किलो दराने या आंब्याची विक्री शहरात होत आहे. गावरान पद्धतीने पिकवलेला आंबा असल्याने शेतातच आंबा खरेदीसाठी ग्राहक येतात. 

फुलेपिंपळगाव शिवारातील अडीच एकर शेतात केशर आंब्याची शंभर झाडे कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत लावली होती. यापैकी ७० झाडे अडचणीवर मात करीत जगविली. 

कुटुंबाचे मिळते सहकार्य
आंब्याची बाग जोपासण्यासाठी बुद्धभूषण साळवे यांना कुटुंबातील सर्वच सदस्यांचे सहकार्य मिळते. मागील दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करीत ही आंब्याची बाग जोपासली. 

कार्बाईडयुक्त आंब्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो, यामुळे गवतात पिकवलेल्या या केशर आंब्याला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. बाजारपेठेत मागणी असल्याने आगामी काळात हा व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार असून पुणे- मुंबईच्या बाजारात हा आंबा पाठवणार असल्याचे बुद्धभूषण साळवे यांनी सांगितले. 

फुले पिंपळगाव शिवारात असलेल्या अडीच एकर केशर आंब्याच्या बागेची काळजी घेत व पाण्याचे योग्य नियोजन करून ७० झाडे जोपासण्यात आली आहेत. बीएस्सीपर्यंत शिक्षण झाले असून नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती करून ही केशर आंब्याची बाग जोपासत शेती व्यवसाय वाढवत आहे.
- बुध्दभूषण साळवे, शेतकरी, फुलेपिंपपळगाव

Web Title: aurangabad marathwada news keshar mango production