कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसची पदयात्रा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

महिलांच्या प्रश्‍नांवर मुख्यमंत्री गप्प का, कार्यकर्त्यांचा सवाल

महिलांच्या प्रश्‍नांवर मुख्यमंत्री गप्प का, कार्यकर्त्यांचा सवाल
औरंगाबाद - कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, अद्यापही त्या निर्भयाला न्याय मिळाला नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. 13) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीतर्फे पदयात्रा काढण्यात आली. महिलांच्या प्रश्‍नांवरून उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलेले असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मूग गिळून का गप्प आहेत, असा प्रश्‍न या वेळी उपस्थित करण्यात आला आहे.

शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सकाळी दहा वाजताच्या सुमारास निघालेली ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. पीडितेला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवदेन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, खटला जलदगती न्यायालयात सुरू असतानाही अद्याप न्याय मिळालेला नाही. उशिराचा न्याय म्हणजे न्याय नाकारल्यासारखेच आहे. अत्याचाराच्या घटना सरकारला गंभीर वाटत नसून स्त्रियांच्या प्रश्‍नांबाबत हे सरकार संवेदनशील नाही. महिलांच्या प्रश्‍नावरून उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलेले आहे. मात्र, सरकार अद्यापही उदासीन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अपयशी ठरलेली असताना गृह खात्याला स्वतंत्र मंत्री देण्यासाठी मुख्यमंत्री नकारात्मक आहेत. स्त्री सक्षमीकरणाचा डंका हे सरकार प्रत्यक्षात काहीच करत नाही. स्त्रियांना मानाने जगण्याचा अधिकार न देणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करीत असल्याचे यावेळी मोर्चेकर्त्यांनी म्हटले.

पक्षाचे शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुनीता चव्हाण, डॉ. अनुपमा पाथ्रीकर, नगरसेविका अंकिता विधाते, वीणा खरे, मंजूषा पवार, सलमा बानो, प्रतिभा वैद्य यांच्यासह कार्यकर्त्या मोठ्या संख्येनी सहभागी झाल्या होत्या.

Web Title: aurangabad marathwada news kopardi case protest rally by ncp