कोपर्डीची निर्भया न्यायाच्या प्रतीक्षेत - तटकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

औरंगाबाद - 'कोपर्डीच्या निर्भयाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून वर्ष उलटत आले, तरीही निर्भयाला न्याय मिळाला नाही. अजूनही ती न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता.13) सकाळी दहा वाजता राज्यभर मूक मोर्चे काढण्यात येतील,'' अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

कोपर्डीतील निर्भया, कर्जमाफी, जनतेतून सरंपच निवड आदी विविध विषयांवर तटकरे यांनी पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, 'कोपर्डीतील घटनेने संतापलेल्या मराठा समाजाने राज्यात शांततेत भव्य मोर्चे काढले. त्या वेळी हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवू, असे आश्‍वासन फडणवीस यांनी दिले होते. प्रत्यक्षात वर्षभरात सरकारने काहीही केल्याचे दिसत नाही. राज्यात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. अशा स्थितीत सरकार काहीच उपाययोजना करताना दिसत नाही. जनतेतून सरपंच निवडीचा घोळ घालून भाजप ग्रामीण विकासाचा खेळखंडोबा करण्याच्या तयारीत आहे.'' या वेळी शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे, प्रा. किशोर पाटील, रंगनाथ काळे, ख्वाजाभाई आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल वाजवावा
तटकरे म्हणाले, 'शिवेसना दुटप्पीपणे वागत आहे. सत्तेत भागीदार व्हायचे, निर्णयप्रक्रियेत सहभाग नोंदवायचा आणि सरकारच्या विरुद्ध ढोल वाजवायचे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्यांच्या घरासमोर ढोल वाजवावा. सत्तेत राहून शेतकरी हितासाठी काही करता येत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे.''

Web Title: aurangabad marathwada news kopardi nirbhaya wait for justice