महापालिकेच्या तिजोरीवर पडणार लाखोंचा भार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

औरंगाबाद - आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेला आता वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाची झळ सहन करावी लागणार आहे. महापौर परिषदेप्रमाणे वर्धापनदिनासाठीही महापालिकेला प्रायोजक मिळालेले नाहीत. त्यामुळे लाखोंचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतूनच केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गुरुवारपासून (ता. सात) तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

औरंगाबाद - आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेला आता वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाची झळ सहन करावी लागणार आहे. महापौर परिषदेप्रमाणे वर्धापनदिनासाठीही महापालिकेला प्रायोजक मिळालेले नाहीत. त्यामुळे लाखोंचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतूनच केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गुरुवारपासून (ता. सात) तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

महापालिकेच्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त गेल्या काही दिवसांपासून कार्यक्रमांची तयारी सुरू आहे. महापौर नंदकुमार घोडले स्वतः लक्ष देऊन कार्यक्रमांचे नियोजन करीत आहेत. सात, आठ व ११ डिसेंबर असे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे या कार्यक्रमांचा खर्च प्रायोजक शोधून करण्यात येणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले होते; मात्र अद्याप प्रायोजक मिळाला नसल्याचे त्यांनी बुधवारी (ता. सहा) सांगितले. त्यामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समारंभ, भोजनावळ, क्रीडा स्पर्धा, महिलांसाठी स्पर्धा, बक्षीस वाटपावर पालिकेच्या तिजोरीतून लाखोंचा खर्च केला जाणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. 

असे आहेत कार्यक्रम 
गुरुवारी सकाळी आठ ते नऊदरम्यान महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता, सकाळी दहा वाजता क्रिकेट सामना, सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत इंदिरानगर येथील प्रियदर्शिनी शाळेत आंतरशालेय विद्यार्थी क्रीडा स्पर्धा, शिक्षक क्रिकेट स्पर्धा घेतली जाईल. मुख्यालयात ११ ते दुपारी दोनदरम्यान रांगोळी, संगीत-खुर्ची, चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. दुपारी सिद्धार्थ उद्यानात माजी महापौरांचा सत्कार आयोजित केला आहे. वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, जवान यांचा सत्कारही केला जाणार आहे.

कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरही या ठिकाणी होणार आहे. 

तीन दिवस सिद्धार्थ उद्यान मोफत 
वर्धापनदिनाच्या निमित्ताने सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयात सात, आठ व नऊ डिसेंबर असे तीन दिवस मोफत प्रवेश मिळणार आहे. तसेच आठ तारखेला मुख्यालयात संगीत रजनी, रात्री आठ वाजता संत एकनाथ रंगमंदिरात विनोदी नाटकाचा प्रयोग, व ११ ला संत एकनाथ रंगमंदिरात सकाळी अकरा वाजता गुणवंत विद्यार्थी, शिक्षक पुरस्कार; तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांना पुरस्काराचे वाटप होईल. दुपारी बाराला महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शिवण व कलाकृतीचे प्रदर्शन होईल.

Web Title: aurangabad marathwada news load on municipal safe