सेफसिटी कॅमेरे, वाहतूक सिग्नलला भारनियमनाचा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - राज्यभर सुरू असलेल्या वीज भारनियमनाचा मोठा फटका सेफसिटी कॅमेरे, वाहतूक सिग्नलला मंगळवारी (ता. १२) बसला. परिणामी कुठे वाहतूक कोंडी, तर कुठे किरकोळ अपघात झाले. शहरात विविध ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी सुरू झालेल्या भारनियमनामुळे वाहतूक सिग्नल बंद झाले. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. शहर पोलिसांना हातावर वाहतूक नियमन करून कसरत करावी लागली.  

महावितरणने अचानकपणे भारनियमन घोषित करून पोलिस, महापालिका प्रशासनाला वाहतूक सिग्नल, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत उपाय योजण्यास वेळच दिला नाही. मंगळवारी सकाळी शहरातील विविध भागांत भारनियमन सुरू झाल्यानंतर वाहतूक सिग्नल बंद झाले; तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही बंद पडले. सुमारे चार ते पाच तास हा प्रकार सुरु होता. भारनियमनाचा मोठा फटका जालना रस्त्यावर बसला. नियमित वर्दळीच्या वेळीच सिग्नल बंद झाल्याने पोलिसांना वाहतूक नियमन करण्यास मोठा अडसर निर्माण झाला. सिग्नल्स नसल्याने त्यांना हातावर वाहतूक नियमन करावे लागले. यामुळे एकाचवेळी कुठे कोंडी, तर कुठे वाहतूक संथावली. यामुळे वाहनधारकांना फटका बसला. विशेषत: पोलिसांना सुमारे चारपेक्षा अधिक तास हातवारे करून वाहतूक नियमन करावे लागल्याने त्यांचीही मोठी कसरत झाली.

सेफसिटीअंतर्गत सुमारे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यातील काही कॅमेरे मेंटेनन्सअभावी बंद असतानाच भारनियमनाच्या काळात सर्वच कॅमेरे बंद पडले. बंद कॅमेरे, बंद सिग्नल्समुळे सुरक्षेसोबतच वाहतूक पणाला लागली होती.

भारनियमनामुळे नागरिकांसोबतच पोलिसांची मोठी दमछाक झाली. हातवारे करून त्यांना वाहतूक नियमन करावे लागले. भारनियमनाच्या वेळेत वाहतूक सुरळीत व्हावी, कॅमेरे सुरू राहावेत यासाठी महापालिकेच्या अभियंत्यांशी बोलणी झाली आहे. यावर तत्काळ उपाय योजण्याचे प्रयत्न होत आहेत.
- सी. डी. शेवगण, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा.

Web Title: aurangabad marathwada news loadshading effect on cctv camera, transport signal