लोडशेडिंगच्या झटक्‍याने संतापाचा भडका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

महावितरणच्या विरोधात नागरिक बिथरले, मुख्य अभियंत्यांच्या दालनातच गोंधळ

औरंगाबाद - कुठलीही पूर्वसूचना न देता सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांनी मंगळवारी (ता. १२) महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयात जाब विचारून अधिकाऱ्यांना भांडावून सोडले. एका शिष्टमंडळाने तर अर्वाच्य शब्द वापरत मुख्यमंत्र्यांचे नागपूर बंद करून दाखवा, अशा शब्दांत रोष व्यक्त केला. लोडशेडिंगमुळे महावितरणाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

महावितरणच्या विरोधात नागरिक बिथरले, मुख्य अभियंत्यांच्या दालनातच गोंधळ

औरंगाबाद - कुठलीही पूर्वसूचना न देता सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांनी मंगळवारी (ता. १२) महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयात जाब विचारून अधिकाऱ्यांना भांडावून सोडले. एका शिष्टमंडळाने तर अर्वाच्य शब्द वापरत मुख्यमंत्र्यांचे नागपूर बंद करून दाखवा, अशा शब्दांत रोष व्यक्त केला. लोडशेडिंगमुळे महावितरणाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

महावितरणने सोमवारी शहरात अर्ध्यापेक्षा अधिक भागांत अचानक तीन ते आठ तासांपर्यंत लोडशेडिंग केले. ज्या भागात अधिक वीज गळती आहे, अशा भागांत लोडशेडिंग करण्यात येत आहे. या अचानक उद्‌भवलेल्या परिस्थितीने महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी अनेक नागरिकांनी शहरातील महावितरणच्या कार्यालयात फोन करून आपला संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांचे फोन खणखणत होते. अभियंत्यांना नागरिक अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहत होते. 

२५ कोटींचे नुकसान
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये लोडशेडिंग करण्यात आल्याने उद्योजकांचे अंदाजे पंचवीस कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील ‘मासिआ’ या उद्योजकांच्या एक शिष्टमंडळाने मंगळवारी सायंकाळी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची भेट घेतली. संतप्त झालेल्या उद्योजकांना श्री. गणेशकर यांना धारेवर धरले. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये लोडशेडिंग करून दाखवा, एकीकडे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जास्तीची वीजनिर्मिती होत असल्याचे सांगत होते. मग अचानक तुटवडा कसा निर्माण झाला. जे ग्राहक नियमित वीजबिल भरतात त्यांचीच वीज कापून त्रास दिला जात आहे, हेच का ‘अच्छे दिन’, असा सवाल उद्योकांनी केला. एका सदस्याने अर्वाच्य शब्दांत सुनावल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अपशब्द वापरणार असाल तर आम्ही ऐकून घेणार नाही, तुमच्याशी चर्चाही करण्याची आमची तयारी नाही, असा अक्रमक पावित्रा गणेशकर यांनी घेतल्यानंतर उद्योजकांनी समजदारीची भूमिका घेतली. त्यानंतर सुरेशकर यांनी नेमकी परिस्थिती सांगितली. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत सामान्य ग्राहकांच्याच फिडरवरून उद्योगांना वीजपुरवठा केलेला आहे, हा पुरवठा वेगळा करण्यासाठी उद्यापासून दिवसभरात दोन्ही पुरवठा वेगवेगळा करण्यासाठी पाच ते दहा मिनिटे पुरवठा बंद होईल. मात्र, त्यानंतर वीजपुरवठ्यात व्यत्यय येणार नाही, असे अश्‍वासन श्री. गणेशकर यांनी शिष्टमंडळाला दिले. या वेळी ‘मासिआ’चे सचिव अनिल पाटील, भगवात राऊत, संदीप जोशी, सचिन गायके, प्रशांत नानकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

दिवसभर ताणतणावाचे प्रसंग 
महावितरणने अचानक लोडशेडिंग केल्याने दिवसभर ताणतणावाचे प्रसंग निर्माण होत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस, एमआयएम, रिपाइं अशा विविध पक्ष-संघटनांच्या शिष्टमंडळांनी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची भेट घेऊन लोडशेडिंगच्या समस्येबद्दल जाब विचारला. यातून शिष्टमंडळांची समजूत घालताना अधिकाऱ्यांची दमछाक होत होती. 
 

कोळशाअभावी विजेचा तुटवडा

राज्यात कोळशाअभावी विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यभर लोडशेडिंगची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात तात्पुरते भारनियमन करण्यात येत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. राज्यासाठी महावितरणची सात हजार मेगावॉट आणि अदानी पॉवर कंपनीकडून तीन हजार ८५ मेगावॉट वीज मिळणे अपेक्षित असताना, अनुक्रमे साडेचार हजार व दोन हजार मेगावॉट वीज मिळत आहे.

त्याचप्रमाणे ‘एम्को’ व ‘सिपत’ या पॉवर कंपन्यांकडूनही अनुक्रमे दोनशे व साडेसातशेऐवजी केवळ शंभर व साडेपाचशे मेगावॉट वीज मिळत आहे. एकूण मागणीपेक्षा विजेचा पुरवठा अर्ध्यावर आल्याने ही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. कोळशाच्या उपलब्धतेबररोबरच महावितरणने तातडीने निविदा काढून ३९५ मेगावॉट वीज खरेदीची तयारी केली आहे. ही वीज मिळण्यास दोन ते तीन दिवस अवधी लागणार आहे. याशिवाय अन्य कंपन्यांकडूनही वीज घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. साधारण आठवडाभर ही परिस्थिती कायम राहू शकते, असे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले.

रुग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द 
अचानक सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे खासगी रुग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्याचा प्रकार सुराणानगर वॉर्डात घडला. माजी नगरसेवक प्रशांत देसरडा यांनी सांगितले, वॉर्डात अनेक हॉस्पिटल असून, लोडशेडिंगमुळे शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. डॉ. सावडेश्‍वर व डॉ. गांधी यांचे हॉस्पिटल असून, गांधी हॉस्पिटलमध्ये सात बालके इन्क्‍युबेटरमध्ये ठेवण्यात आलेली आहेत; तर सावडेश्‍वर हॉस्पिटलमध्ये १४ जण अतिदक्षता विभागात आहेत. लोडशेडिंगमुळे या रुग्णांना धोका निर्माण झाला असून, अनुचित प्रकार घडल्यास त्याला महावितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशारा श्री. देसरडा यांनी दिला. वॉर्डात सकाळी सात ते १०.३० व दुपारी तीन ते रात्री ७.३० अशा दोन वेळा लोडशेडिंग करण्यात आल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सुराणानगर भागातील वसुली ९० टक्के आहे; मात्र हा भाग टाकण्यात आलेल्या एफ फिडरची वसुली केवळ ४५ टक्के आहे. यात सुराणानगरच्या वीज बिल भरणाऱ्या नागरिकांचा काय दोष? असा सवाल श्री. देसरडा यांनी केला.

लोडशेडिंगमुळे पाण्यासाठी होणार हाल 
लोडशेडिंगमुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होणार आहेत. शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक विद्युत पंप लावून पाणी घेतात. दुसऱ्या मजल्यापासून पाचव्या सहाव्या मजल्यावर राहणाऱ्यांना तर विद्युत पंपाशिवाय पाणी मिळूच शकत नाही; मात्र आता लोडशेडिंग सुरू झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. लोडशेडिंगच्या काळात एक तर पाणी देण्यात येऊ नये किंवा पाण्याच्याच वेळा बदलण्याची मागणी नगरसेवकांकडे केली जात आहे. मंगळवारी (ता. १२) नगरसेवकांचे या मागणीसाठीच फोन खणखणले.

लोडशेडिंग केलेला भाग

शहरामध्ये दोन लाख ८२ हजार वीज ग्राहक आहेत. या ग्राहकांसाठी १९१ फिडर असून, त्यापैकी ६७ फिडरवर लोडशेडिंग केली जात आहे. जवळपास साठ ते सत्तर टक्के शहर काळोखात बुडाले. 
 सिटी चौक वाहिनीवरील : भडकलगेट, टाऊन हॉल, जयभीमनगर, नूर कॉलनी, नेहरू भवन, जामा मस्जिद. 
 वसंत भवन वाहिनीवरील : संतोषीनगर, नारळीबाग, जुनाबाजार, बारुदगर नाला, धनमंडी, दगड गल्ली, वसंत भवन परिसर. 
 मकबरा : विद्युत कॉलनी, आरेफ कॉलनी, गौतमनगर, प्रगती कॉलनी, मकाईगेट, आसेफिया कॉलनी, महेबूब कॉलनी, पहाडसिंगपुरा, जलाल कॉलनी आणि गुलाबवाडी. 
 पाणचक्की : लालमंडी, बेगमपुरा, कुतुबपुरा, जयसिंगपुरा, बिमसार गल्ली. 
 कोहिनूर कॉलनी : घाटी रुग्णालय परिसर, जिल्हा परिषद निवासस्थान, जुबिली पार्क, कोहिनूर कॉलनी. 
 आयटीआय : मिलिंदनगर, कबीरनगर, वेदांतनगर, बन्सीलालनगर, रेल्वेस्टेशन, सब्जीमंडी. 
 राहुलनगर : सिल्कमिल कॉलनी, साजादनगर, राहुलनगर, जालाननगर, शाह दर्गा, महानुभाव आश्रम, धनगरवाडा. 
 होलिक्रॉस परिसर : होलिक्रॉस शाळा परिसर, पोस्ट ऑफिस, पद्मपुरा भाग, बन्सीलालनगर, बनेवाडी, कोकणवाडी, फॉरेन्सिक लॅब परिसर, जिल्हा न्यायालय व परिसर, कर्णपुरा, पंचवटी परिसर, रेल्वेस्टेशन परिसर. 
 छावणी : नेहरू चौक, ख्रिस्तनगर, छावणी परिसर, होलिक्रॉस शाळा व परिसर, नंदनवन कॉलनी. 
 मिलिंद कॉलनी वाहिनी : मिलिंद कॉलेज परिसर, भीमनगर, छावणी पोलिस ठाणे, भुजबळनगर. 
 आयईआरबी वाहिनी : आयईआरबी, सातारा तांडा, श्रेयस इंजिनिअरिंग व परिसर. 
 नाथ व्हॅली स्कूल वाहिनी : नाथपूरम, मोदीनगर, इटखेडा, आनंदविहार सारा हार्मोनी, माँ-बाप दर्गा परिसर, ब्रेस्ट प्राईज मॉल परिसर, सुधाकरनगर, शिल्पनगर, ऑरेंज सिटी, धन्वंतरी, चौधरी, ठक्कर, प्राईजेस. 
 पेठेनगर परिसर : भाऊसिंगपुरा व परिसर, ग्लोरिया कॉलनी, पेठेनगर, भीमनगर. 
 दर्गा फिडर : शहा कॉलनी, कासंबरी दर्गा व परिसर. 
 रोशनगेट वाहिनी : जुना बाजार, सरदार पटेल रोड, राजाबाजार, जिन्सी, कैसर कॉलनी, रामनसपुरा चौक, मीनाबाजार, भुळगुडा, निजामुद्दीन रोड, निजामुद्दीन रोड, मदिना मार्केट, घासमंडी, शहाबाजार, चेलिपुरा, स्टेट टॉकीज परिसर, गांधी भवन व परिसर. 
 नेहरू भवन वाहिनी : बुलबुलेन, आमखास आणि परिसर, कबाडीपुरा व परिसर. 
 सिटी चौक वाहिनी : लेबर कॉलनी, किलेअर्क, लोटाकारंजा, सिटी चौक, मन्सूरपुरा, कासारी बाजार, रोहिला गल्ली व परिसर. 
 गणेश कॉलनी वाहिनी : फाजलपुरा, एस.टी. कॉलनी, गणेश कॉलनी, रशीदपुरा, आलमगी कॉलनी व परिसर. 
 रोझाबाग फिडर : प्रोफेसर कॉलनी, रोजबाग परिसर, एसबीएच कॉलनी, हडको एन- १२ परिसर. 
 आरतीनगर फिडर : मिसारवाडी, आरतीनगर, अकबर कॉलनी, भक्तीनगर, गोकुळनगर. 
 जसवंतपुरा फिडर : सना हॉटेल परिसर, राम मंदिर, रोशनगेटचा भाग, रहेमानियाँ कॉलनी, किराडपुरा, जसवंतपुरा. 
 जकात नाका फिडर : मदिना चौक, सेंट्रल जकात नाका परिसर, अल्तमश कॉलनी, बारी कॉलनी, टेकलक सोसायटी व परिसर. 
 आझाद चौक फिडर : यशोधरा कॉलनी, नेहरूनगर, सईद मस्जिद, हत्तीसिंगपुरा, किराडपुरा व परिसर. 
 औरंगाबाद टाईम्स कॉलनी : रोशनगेट, आजम कॉलनी, रवींद्रनगर, त्रिवेणीनगर, टाईम्स कॉलनी, मकसूद कॉलनी. 
 सुभेदारी विश्रामगृह : ग्रीन व्हॅली, नॅशनल कॉलनी, चाऊस कॉलनी.
 दिल्ली गेट : हर्सूल जकात नाका, जहांगीर कॉलनी, फातेमानगर, मुल्ला गल्ली व परिसर, सोनार गल्ली, बेरीबाग व परिसर. 
 भीमटेकडी : सारा वैभव, होनाजीनगर, राधास्वामी कॉलनी, एव्हरेस्ट कॉलनी, राजनगर व परिसर. 
 भगतसिंगनगर : छत्रपतीनगर, दिशा वूड्‌स, आईसाहेब नगर व परिसर.

Web Title: aurangabad marathwada news loadshading by electricity