औरंगाबाद लोकसभेची रंगत वाढणार

शेखलाल शेख
बुधवार, 24 जानेवारी 2018

औरंगाबाद - शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिल्याने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मतांची आकडेमोड सुरू केली आहे. २००९ नंतर शांतिगिरी महाराजांनी भाजप किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने रंगत अधिकच वाढणार असे दिसते. भाजपची अजून शोधमोहीम सुरू आहे, काँग्रेसचा उमेदवार कोण? यावर पक्षात खल सुरू आहे, तर ‘एमआयएम’ची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. अशातच नव्याने स्थापन झालेल्या मराठवाडा विकास सेनेचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी देखील लोकसभेच्या आखाड्यात आपला पक्ष जोर अजमाविणार असल्याचे जाहीर केले आहे.  

औरंगाबाद - शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिल्याने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मतांची आकडेमोड सुरू केली आहे. २००९ नंतर शांतिगिरी महाराजांनी भाजप किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने रंगत अधिकच वाढणार असे दिसते. भाजपची अजून शोधमोहीम सुरू आहे, काँग्रेसचा उमेदवार कोण? यावर पक्षात खल सुरू आहे, तर ‘एमआयएम’ची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. अशातच नव्याने स्थापन झालेल्या मराठवाडा विकास सेनेचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी देखील लोकसभेच्या आखाड्यात आपला पक्ष जोर अजमाविणार असल्याचे जाहीर केले आहे.  

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना धोबीपछाड देण्यासाठी भाजपने जोरदार तयारी चालविली आहे. शिवसेनेच्या मतांना सुरंग लावू शकेल अशा उमेदवारांना रसद पुरवून अपक्ष उतरविण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे. त्यामुळे खासदार खैरे यांना २०१९ च्या निवडणुकीचा पेपर जरा कठीणच जाणार असे दिसते; पण दरवेळी अवघड परीक्षा पास होण्याची खैरेंची ख्याती आहे. आतापर्यंत शिवेसना-भाजप लोकसभा निवडणूक युतीने लढल्यामुळे खासदार खैरे या मतदारसंघातून सलग चारवेळा निवडून येऊ शकले; परंतु २०१९ च्या लोकसभा स्वतंत्र लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यामुळे खासदार खैरेंचे टेन्शन निश्‍चितच वाढणार आहे. पक्षनेतेपदाची जबाबदारी आल्यामुळे त्यांना मतदारसंघाबरोबरच मराठवाड्यातील इतर उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल.

शांतिगिरी महाराजांमुळे डोकेदुखी वाढणार
भाजपने उमेदवारी दिली नाही तरी आपण अपक्ष लढणार असा निर्धार शांतिगिरी महाराज यांनी बोलून दाखविला आहे. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत शांतिगिरी महाराजांनी दीड लाखाच्या आसपास मते मिळवीत खैरे यांचे मताधिक्‍य अवघ्या ३३ हजारांवर आणले होते. त्यामुळे शांतिगिरी महाराजांची उमेदवारी खैरेंसाठी धोक्‍याची घंटा ठरू शकते. २००९ मध्ये शांतिगिरी महाराजांनी तिसऱ्या क्रमांकाची लक्षणीय १ लाख ४८ हजार २६ मते घेतली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी २०.६४ एवढी होती. तर दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेस उमेदवार उत्तमसिंह पवार यांना २ लाख २२ हजार ८८२ मते मिळाली होती. 

शिवसेनेच्या मतांमध्ये खिंडार पाडण्याची रणनीती
भाजपकडून शिवसेनेची मते खाणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू आहे. शांतिगिरी महाराज भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असले तरी त्यांना भाजपकडून तिकीट मिळेल याची अद्यापही कोणती शाश्‍वती नाही. त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरविल्यास याचा फटका शिवसेनेला बसतो. त्यातच जुन्या शिवसैनिकांनी स्थापन केलेल्या मराठवाडा विकास सेनेनेसुद्धा मराठवाड्यातील ८ लोकसभा आणि ४८ विधानसभा मतदारसंघांत उमेदवार देण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे मराठवाडा विकास सेनेचा उमेदवारसुद्धा शिवसेनेची सर्वाधिक मते घेण्याची शक्‍यता आहे. अटीतटीच्या लढतीत काही शेकडा, हजार मतेसुद्धा अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे शिवसेनेची मते खाणाऱ्या उमेदवारांना अपक्ष म्हणून मैदानात उतरवून मतविभाजानाचा फायदा घेण्याची रणनीती भाजपकडून सुरू आहे. सध्या भाजपकडून लोकसभेसाठी डॉ. भागवत कराड, जयसिंगराव गायकवाड, विजया राहटकर यांची नावे चर्चेत आहेत. 

युतीतील फाटाफूट काँग्रेसच्या पथ्यावर
शिवसेना, भाजपच्या मतांमधील फुटीचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला होणार हे उघड आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतसुद्धा काँग्रेसचे उमेदवार नितीन पाटील यांनी ३ लाख ५८ हजार ९०२ मते घेतली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी ३६.५१ होती. तर खासदार खैरे यांना ५ लाख २० हजार ९०२ मते मिळाली होती. मोदी लाटेत खैरे यांचा १ लाख ६२ हजार मतांनी विजय झाला होता; मात्र सद्यःस्थिती बघता आगामी लोकसभा निवडणुकीत काट्याची टक्कर होणार एवढे मात्र निश्‍चित. औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेसकडून सुभाष झांबड, कल्याण काळे यांच्या नावांची चर्चा आहे. 

‘एमआयएम’चीही लोकसभेसाठी तयारी
भाजप, शिवसेना, काँग्रेसचे उमेदवार आणि शांतिगिरी महाराज अपक्ष म्हणून मैदानात उतरले तर ‘एमआयएम’चा उमेदवारसुद्धा लढतीत असण्याची शक्‍यता आहे; मात्र याचा फटका नेहमीप्रमाणे काँग्रेस उमेदवाराला बसेल. ‘एमआयएम’ने लोकसभा निवडणूक लढविण्याचा अधिकृतपणे निर्णय घेतला नसला, तरी आमची लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे आमदार इम्तियाज जलील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

मोदींमुळे जिंकलो नाही
मागील निवडणुकीत युतीचा खासदार म्हणून निवडून आलो, हे मला मान्य आहे; मात्र मोदी लाटेमुळेच मी निवडून आलो, असे म्हणणे चुकीचे आहे. या आधीच्या निवडणुकांमध्ये मी बॅरिस्टर अंतुलेंना हरविले, त्यानंतर रामकृष्ण बाबांना हरविले, शांतीगिरी महाराजांचाही पराभव केला. त्यावेळी मोदी होते का? मागील निवडणुकीत मोदी लाटेमुळे दहा टक्के मते वाढली आहेत, हे मला मान्य आहे.

- २००९ मधील लोकसभा निवडणुकीतील 
प्रमुख उमेदवार मिळालेली मते (मतांची टक्केवारी)
चंद्रकांत खैरे (शिवसेना)  २,५५,८९५ (३५ टक्के)
उत्तमसिंह पवार (काँग्रेस) २,२२,८८२ (३०.४८ टक्के)
शांतिगिरी महाराज (अपक्ष) १,४८,०२६ (२०.२४ टक्के)

- २०१४ मधील लोकसभा निवडणुकीतील स्थिती 
चंद्रकांत खैरे (शिवसेना) ५,२०,९०२ (५२.९९ टक्के)
नितीन पाटील (काँग्रेस) ३,५८,९०२ (३६.५१ टक्के)
इंदरकुमार जेवरीकर (बसप) ३७,४१९ (३.८१ टक्के)

आता मीच बॉसः खासदार खैरे 
‘‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी नेतेपदी निवड केल्यानंतर आता मीच बॉस आहे, सर्व शिवसैनिक माझेच आहेत, गटबाजीचा प्रश्‍नच नाही. सर्वांसोबत काम करू, आउटगोईंग बंद, इनकमिंग सुरू’’, असे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी (ता. २३) सांगितले. ते म्हणाले, ‘‘नेतेपदी निवड झाली, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण आहे. सामान्य शिवसैनिक ते नेता हा प्रवास पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानेच झाला.’’ शिवसेनेच्या गटबाजीसंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर खैरे म्हणाले, ‘‘येत्या सहा महिन्यांत पक्ष संघटनेत बदल दिसेल. विमानतळावरून येतानाच काही जणांना पक्षात येण्यासंदर्भात बोललो आहे’’, असेही श्री. खैरे म्हणाले.

Web Title: aurangabad marathwada news loksabha election