सामूहिक प्रयत्नांतून समाजपरिवर्तन घडवूया - प्रतापराव पवार

सामूहिक प्रयत्नांतून समाजपरिवर्तन घडवूया - प्रतापराव पवार

औरंगाबाद - "आधुनिकीकरणाची कास धरत तळागाळातील लोकांना आत्मविश्‍वास देण्याचा प्रयत्न "सकाळ' विविध उपक्रमांच्या माध्यमातून करत आहे. भविष्यातदेखील क्रियाशीलता व सामूहिक प्रयत्नांच्या बळावर समाजपरिवर्तन घडवूया,' असे प्रतिपादन "सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.

"सकाळ' मराठवाडा आवृत्तीच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी सिडको नाट्यगृहात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार प्रतापराव पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर "सकाळ' मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड, उपसरव्यवस्थापक रमेश बोडके यांची उपस्थिती होती. या वेळी पवार म्हणाले, ""बदलत्या काळाचा वेध घेत पावलं टाकण्याचा प्रयत्न "सकाळ'च्या माध्यमातून नेहमीच केला जातो. दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सर्वप्रथम "सकाळ'ने आणली. गेल्या वर्षी 350 गावांमध्ये लोकसहभागातून योजना राबविली आणि तेथील पाण्याचा प्रश्‍न सोडविला. सामूहिक प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे या वर्षी आणखी 440 गावांचे काम हाती घेतले आहे. याशिवाय सोशल मीडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन "सकाळ ऍप', "ई-सकाळ'द्वारे जगभरातील माहिती वाचकांपर्यंत पोचविण्याचे काम सुरू आहे.''

खेडी स्वयंपूर्ण करणार
देशातील खेडी स्वयंपूर्ण करण्याचा ध्यास घेऊन इस्राईलचे तज्ज्ञ महाराष्ट्रात आणणारे "सकाळ' हे जगातील एकमेव वृत्तपत्र आहे. 20 कोटी रुपये खर्चून इस्राईलच्या तज्ज्ञांकडून पाच गावांचा विकास केला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला, की खेडी स्वयंपूर्ण करण्यासाठी ते "रोल मॉडेल' ठरेल, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला.

महिलांना संगणक प्रशिक्षण देणार
महिला शिकली तर घराची प्रगती होते, म्हणूनच ग्रामीण भागातील महिला शिकली पाहिजे. जगात कुठे नवीन काय चालले आहे, याची माहिती तिला घरबसल्या मिळावी, त्यातून तिची आर्थिक प्रगती व्हावी, या हेतूने महिलांना इंटरनेट व संगणकाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम गुगलच्या साहायाने "सकाळ समूहा'ने हाती घेतला आहे. महिलांना संधी दिली, तर त्या संधीचं सोनं करतात, याचा अनुभव "तनिष्का'च्या माध्यमातून आला आहे. हे काम पाहूनच गुगलने या उपक्रमासाठी "सकाळ'ची निवड केल्याचे पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com