पुरुष वाहनचालकांची आरटीओत 'फिमेल' नोंद

अनिल जमधडे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) राज्यात सर्वप्रथम संपूर्ण संगणकीकरणाचा मान मिळवला; मात्र वर्ष होत आले तरीही संगणकीकरणात अनेक त्रुटी कायम आहेत. त्या दूर करताना अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. संगणकीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत वाहन परवाना काढणाऱ्या प्रत्येकाची नोंद "फिमेल' अशी केली जात आहे. ही संगणकीय त्रुटी असल्याचे सांगून कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत.

औरंगाबाद आरटीओ कार्यालयाचे गेल्या वर्षी 20 ऑक्‍टोबरला संगणकीकरण झाले आहे. संपूर्ण कामकाज ऑनलाइन करणारे हे राज्यातील पहिले कार्यालय आहे. यासाठी जुनी वाहन 0.1 ही प्रणाली 0.4 मध्ये तर सारथी 0.1 कार्यप्रणाली 0.4 मध्ये परावर्तीत करून घेतली; मात्र सध्या ही ऑनलाइन प्रणालीच नागरिकांसह आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. घाईघाईने सुरू झालेल्या संगणकीकरणाचा त्रास वर्ष झाले तरीही कायम आहे. वाहन परवाना काढताना, ऑनलाइन अर्ज भरतेवेळी "जेंडर' या रकान्यात "फिमेल' हा एकच पर्याय आहे. त्यामुळे अर्ज भरताना प्रत्येकाची "फिमेल' म्हणूनच नोंद केली जाते.

हा पर्याय परवान्यावर येत नाही, तो केवळ मूळ अर्जावरच कायम राहतो. त्यामुळे अधिकारी बिनधास्तपणे "फिमेल' म्हणून नोंदवलेले अर्ज जमा करून घेत आहेत. मात्र काही वर्षांनंतर संबंधितांचे रेकॉर्ड काढण्याची गरज पडल्यास त्यावेळी असलेले अधिकारी ही त्रुटी समजून घेणार नाहीत व त्यातून अडचणी निर्माण होऊ शकतात. काही दिवसांपूर्वी याच संगणकीय त्रुटीने जुन्या सर्व्हरचा डेटा नवीन सर्व्हरमध्ये घेताना, शेख नावाच्या आडनाव असलेल्या नागरिकांच्या डेटाची सरमिसळ झाल्याने अनेकांचे नाव, वडिलांचे नाव चुकले. पत्त्यांमध्येही चुका झाल्या. त्यावेळी झालेल्या या चुकांची दुरुस्ती करताना अधिकारी अजूनही त्रस्त आहेत.

Web Title: aurangabad marathwada news man driver female registration in rto