तत्काळ मदतीमुळे टळली जीवितहानी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

औरंगाबाद - माणिक हॉस्पिटलच्या  आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच मदतकार्य करीत ३२ रुग्ण, डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना मागच्या बाजूने सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे जीवितहानी टळली. दरम्यान, मदतकार्य करताना जवान संजय कुलकर्णी यांचा धुरामुळे श्‍वास कोंडला. त्यांच्यासह रुग्णांना इतर चार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

औरंगाबाद - माणिक हॉस्पिटलच्या  आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच मदतकार्य करीत ३२ रुग्ण, डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना मागच्या बाजूने सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे जीवितहानी टळली. दरम्यान, मदतकार्य करताना जवान संजय कुलकर्णी यांचा धुरामुळे श्‍वास कोंडला. त्यांच्यासह रुग्णांना इतर चार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

हेडगेवार रुग्णालयाची तत्परता
दुर्घटनेची माहिती मिळताच हेडगेवार रुग्णालयाचे सुधीर देशपांडे यांनी त्यांच्या रुग्णालयातील ब्ल्यू कोड सिस्टीमचा अलार्म वाजविला. सुरवातीला मदतीसाठी तत्काळ पाच जणांची टीम माणिक हॉस्पिटलला पोचली. त्यानंतर लगेचच दुसरी आणि तिसरी टीम पाठविण्यात आली. २० जणांनी मदतकार्य करीत रुग्णांना हेडगेवार रुग्णालयात हलविले. मकरंद धर्माधिकारी, विक्रम बडवे यांनी गर्दीत गोंधळलेल्यांना दिशादर्शकाचे काम केले. दरम्यान, ‘हेडगेवार’चे अर्धे सुरक्षारक्षक मदतीला धावले. त्यांनी रस्ता बंद करीत मदतकार्य केल्याची माहिती हेडगेवार रुग्णालयाचे संचालक डॉ. अनंत पंढरे यांनी सांगितले.

या ठिकाणी सुरू आहेत उपचार
हेडगेवार रुग्णालयाच्या चमूने या रुग्णांना तत्काळ ‘हेडगेवार’मध्ये दाखल करून घेतले. यापैकी आठ जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले; तर पंधरा जणांना भरती करून घेण्यात आले. तिघांना सिग्मा हॉस्पिटलमध्ये संदर्भीत करण्यात आले. अग्निशमनचे जवान कुलकर्णी यांच्यावर ‘जेजे प्लस’मध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असून, त्यांना रोपळेकर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

असे झाले रेस्क्‍यू ऑपरेशन 
अग्निशमन दलाच्या जवानांनी दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या खिडक्‍यांना शिडी लावली. पोलिस, डॉक्‍टर व नागरिकांनीही मदत केली. रुग्णांना शिडीद्वारे खाली आणले; तर आत अडकलेले डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांना दोरीच्या साह्याने खाली उतरवले. अत्यवस्थ रुग्णांसाठी ऐनवेळी रुग्णवाहिकांचा तुटवडा जाणवला; परंतु नंतर अनेक रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णवाहिका माणिक हॉस्पिटलकडे रवाना केल्या. यावेळी सुमारे तीनशे ते चारशे नागरिकांनी मदत केली. यात विविध संघटना, पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही सामील झाले होते. घटनास्थळी पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त नागनाथ कोडे यांनी मदतकार्य केले. 

व्हेंटिलेशन नसल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडक्‍यांच्या काचा फोडून धूर बाहेर काढला.
सिडको, पदमपुरा, सेव्हनहिल, चिकलठाणा, एमआयडीसीचे सात बंब तैनात होते. 
सुमारे अठरा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा. तीस ते पस्तीस जवान व अधिकारी मदतीसाठी कार्यरत.

साडेअकराच्या सुमारास कॉल आला. त्यानंतर आम्ही माणिक हॉस्पिटलच्या दिशेने धावलो. तळमजल्यात पूर्ण धूर झाला. तरीही एका बाजूने व दोन्ही बाजूंनी दोन पथकांनी एकाचवेळी मदतकार्य सुरू केले. नेमके आगीचे उगमस्थानच काही क्षण उमगले नव्हते. त्यानंतर मात्र आत गेलो व शर्थीचे प्रयत्न केले. 
- संजय कुलकर्णी, जवान. 

धूर जास्त झाल्याने मदतकार्यात काहीवेळ अडथळे आले. दहा ते बारा रुग्ण तळमजल्यातून बाहेर काढले. आमच्या प्रयत्नांमुळे जीवित हानी टळली व आग लगेच आटोक्‍यात आणली. आगीचे कारण नेमके स्पष्ट झाले नाही.
- आर. के. सुरे, मुख्य अग्निशमन अधिकारी.

तळमजल्याने भयंकर पेट घेतला होता. आग थरारक होतीच; परंतु धुरामुळे मदतकार्याला अडचण आली. फायर सेफ्टीचे नियम पाळण्यात आले नसल्याचे काही नागरिक म्हणत असून, आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
- एम. एल. मुंगसे, अग्निशमन प्रमुख.

तळमजल्यात आग लागली तेव्हा सात रुग्ण आत होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. रुग्णालयाची अग्निशमन सुरक्षा मजबूत नव्हती. त्यामुळे आग फोफावली. फायर सेफ्टीसाठी रुग्णालयात ऑपरेटरच नव्हता. 
- विष्णू वाघमोडे, मदतकर्ता.

आगीमुळे ३२ रुग्णांना हेडगेवार, सिग्मा आणि रोपळेकर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. या घटनेत किती नुकसान झाले याचा अजून अंदाज आलेला नाही; मात्र जीवितहानी झालेली नाही. 
- डॉ. उल्हास कोंडापल्ले, संचालक, माणिक हॉस्पिटल

रक्तदाबाचा त्रास असल्याने गेल्या आठ दिवसांपासून उपचार घेत होतो. मुलगा डबा घ्यायला घरी गेला होता. तेव्हाच आग लागल्याने सर्वत्र धूर झाला. गोंधळाचे वातवरण होते. मुख्य रस्त्याने जाणे शक्‍य नव्हते. त्यामुळे मागच्या बाजूने नागरिकांच्या मदतीने बाहेर पडलो. डॉक्‍टरांनी रुग्णवाहिकेत हेडगेवार रुग्णालयात दाखल केले. 
- दिनेश खनोजिया, बचावलेला रुग्ण.

हॉस्पिटलविरोधातील तक्रारींकडे दुर्लक्ष
माणिक हॉस्पिटलच्या आगीनंतर अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. रुग्णालय असलेल्या इमारतीच्या साइड मार्जिनमध्ये अतिक्रमण करून जनरल वॉर्ड, अल्पोपाहारगृह तर पार्किंगमध्ये रुग्णांची वेटिंग रूम, एक्‍सरे मशीन थाटण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनदेखील दखल घेण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

इमारतीला चारही बाजूने सहा मीटरची साइड मार्जिन गरजेची आहे. मात्र येथील साइड मार्जिन चारही बाजूने ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्याचा वापर जनरल वॉर्ड व इतर कामांसाठी करण्यात येत आहे. पार्किंगच्या जागेतही अतिक्रमण करून रुग्णांसाठी वेटिंग रूम, एक्‍सरे मशिन लावण्यात आले आहे. यासंदर्भात महापालिकेकडे परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हॉस्पिटलची मनमानी सुरू होती. या अतिक्रमणामुळेच सोमवारी अग्निशमन विभागाची वाहने जाण्यास अडथळा निर्माण झाला. दरम्यान आगीच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनालादेखील जाग आली आहे. इमारतीच्या फाइलचा शोध सध्या घेण्यात येत आहे. दरम्यान, इमारतीचे मजले वाढविण्यात येत असून, त्यासाठी महापालिकेकडून नव्याने बांधकाम परवानगी घेण्यात आली असल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे.

फायर ऑडिटच नाही 
शहरातील शेकडो इमारतींचे फायर ऑडिट झाले नसताना त्यांचा वापर सुरू आहे. माणिक हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा असली तरी त्याचे फायर ऑडिट झालेले नाही, असे सूत्रांनी सांगितले. मुंबईतील एका इमारतीला लागलेल्या आगीनंतर शहरातील सर्वच इमारतींचे फायर ऑडिट करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. मात्र प्रशासन गाफील आहे.

Web Title: aurangabad marathwada news manik Hospital Fire