मराठवाडा साहित्य परिषदेचे पाच वाङ्‌मय पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदापासून बी. रघुनाथ यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा परिषदेने निर्णय घेतला असून पहिला बी. रघुनाथ वाङ्‌मय पुरस्कार प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या "उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीला जाहीर झाला आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार दिले जातात. येत्या 29 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथे प्रसिद्ध साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी शनिवारी पुरस्कारांची घोषणा केली. मराठवाड्यातील लेखक व कवींना दिला जाणारा नरहर कुरुंदकर वाङ्‌मय पुरस्कार केशव वसेकर यांच्या "पाऊलवाट' या ग्रंथाला दिला जाणार आहे. प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्‌मय पुरस्कार पुणे येथील डॉ. विलास खोले यांच्या "विलोकन' ग्रंथाला जाहीर झाला. मराठीतील समीक्षा व वैचारिक लेखनासाठी हा पुरस्कार दिला जातो. मराठीतील उत्कृष्ट कविता लेखनासाठी दिला जाणारा कै. कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार औरंगाबाद येथील कवी ना. तु. पोघे यांच्या "बिनचेहऱ्यांचे अभंग' या कवितासंग्रहाला देण्यात येणार आहे. प्रत्येकी तीन हजार रुपये असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. मराठी ग्रंथव्यवहारात महत्त्वाचे कार्य करणाऱ्या व्यक्‍तीस दिला जाणारा रा. ज. देशमुख स्मृती पुरस्कार सुमती लांडे यांना जाहीर झाला. दोन हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सुमती लांडे या शब्दालय प्रकाशनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मराठी ग्रंथव्यवहारात महत्त्वाचे कार्य करत आहेत.

Web Title: aurangabad marathwada news marathwada sahitya parishad award