महापौर परिषद गुंडाळली एकाच दिवसात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

दुसऱ्या दिवशी खड्डा‘दर्शन’; ढिसाळ नियोजनाने अनेकजण माघारी

औरंगाबाद - दोनदिवसीय अखिल भारतीय महापौर परिषदेला आलेल्या एकूण ३४ महापौरांपैकी जवळपास सर्वच जण ढिसाळ नियोजनामुळे शनिवारी (ता. नऊ) रात्री व रविवारी (ता. १०) सकाळी आपापल्या शहरांकडे रवाना झाले. त्यामुळे दोन दिवसांची महापौर परिषद पहिल्या दिवशीच गुंडाळण्यात आली, तर दुसरा दिवस पर्यटनस्थळांच्या सहलीतच गेला. 

दुसऱ्या दिवशी खड्डा‘दर्शन’; ढिसाळ नियोजनाने अनेकजण माघारी

औरंगाबाद - दोनदिवसीय अखिल भारतीय महापौर परिषदेला आलेल्या एकूण ३४ महापौरांपैकी जवळपास सर्वच जण ढिसाळ नियोजनामुळे शनिवारी (ता. नऊ) रात्री व रविवारी (ता. १०) सकाळी आपापल्या शहरांकडे रवाना झाले. त्यामुळे दोन दिवसांची महापौर परिषद पहिल्या दिवशीच गुंडाळण्यात आली, तर दुसरा दिवस पर्यटनस्थळांच्या सहलीतच गेला. 

महापौर बापू घडमोडे यांनी रविवारी आयोजित केलेला पर्यटन दौरा व सायंकाळच्या भोजनावळीला केवळ मोजकेच महापौर उपस्थित होते. मागे राहिलेल्या महापौरांनी रस्त्यांवरील खड्ड्यांचे ‘दर्शन’ घेत सकाळी साडेनऊपासून शहरातील व शहराजवळच्या ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेटी देउन खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनाने पर्यटन दौरा संपविला.

गणेशोत्सव विसर्जनाच्या नियोजनाला दुय्यम स्थान देत महापौर परिषदेच्या आयोजनाच्या तयारीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जुंपले होते. येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये १०९ व्या अखिल भारतीय महापौर परिषदेचे आयोजन केले होते. दोन दिवसांच्या महापौर परिषदेतील सर्व मुख्य कार्यक्रम शनिवारी पहिल्याच दिवशी उरकण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी रविवारी केवळ पर्यटनस्थळांना भेटी देण्यापलीकडे दुसरा कार्यक्रम नसल्याने अनेक महापौर शनिवारीच परतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने या परिषदेवर सुमारे ३० लाखांचा खर्च केला. महापालिकेतीलच एका बड्या अधिकाऱ्यांच्या नातेवाइकालाच या कामाच्या संयोजनाचे ऐनवेळी कंत्राट देण्यात आले होते. तर दुसरीकडे परिषदेच्या कामासाठी प्रशासनाने अधिकाऱ्यांनाही कामाला लावले होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच परिषदेत विविध मागण्यांचे ठराव मंजूर करून समारोप करण्यात आला. परिषदेतील ढिसाळ नियोजनामुळे विविध शहरांतून आलेल्या महापौरांना चहापानही व्यवस्थित मिळाले नाही. भोजनाचीही परवड झाली. यामुळे जवळपास निम्म्या महापौरांनी सायंकाळीच आपापली शहरे जवळ केली.

पर्यटन सहलीला सहा महापौर
रविवारी पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी केवळ सहा शहरांचे महापौर उपस्थित होते. त्यांना पाणचक्‍की, बिबी-का-मकबरा, सिद्धार्थ उद्यानासह देवगिरीचा किल्ला, वेरूळ लेणी आणि खुलताबाद येथील भद्रा मारुती दर्शन एवढ्याच ठिकाणची पर्यटन सहल घडविण्यात आली. सायंकाळी महापौर बंगल्यावर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व भोजनावळीला तर चारच महापौर शिल्लक होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: aurangabad marathwada news mayor conferance