गच्चीवरून पडल्याने तान्हुल्यासह आईचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

औरंगाबाद - तान्हुल्या बाळाला सकाळच्या सूर्यप्रकाशात ठेवण्यासाठी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गच्चीवर गेलेल्या आईचा तोल गेला. त्यानंतर ती तान्हुल्यासह जमिनीवर कोसळून ठार झाली. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना मंगळवारी (ता. तीन) सकाळी आठच्या सुमारास गारखेड्यातील मुथा कॉम्प्लेक्‍समध्ये घडली.

औरंगाबाद - तान्हुल्या बाळाला सकाळच्या सूर्यप्रकाशात ठेवण्यासाठी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गच्चीवर गेलेल्या आईचा तोल गेला. त्यानंतर ती तान्हुल्यासह जमिनीवर कोसळून ठार झाली. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना मंगळवारी (ता. तीन) सकाळी आठच्या सुमारास गारखेड्यातील मुथा कॉम्प्लेक्‍समध्ये घडली.

रोहिणी राहुल भंडारी (वय ३०, रा. जालना) असे मृत आईचे नाव आहे. याबाबत जवाहरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारखेड्यातील मुथा कॉम्प्लेक्‍समधील रहिवासी चंद्रकांत तातेड यांची मुलगी रोहिणी हिचा अकरा महिन्यांपूर्वी जालना येथील कापड विक्रेते राहुल भंडारी यांच्याशी विवाह झाला. बाळंतपणासाठी चार महिन्यांपासून रोहिणी भंडारी माहेरी मुथा कॉम्प्लेक्‍स येथे आल्या होत्या. २४ फेब्रुवारीला त्यांची प्रसूती होऊन मुलगा झाला. बाळाला घेऊन त्या सकाळी आठच्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्या. बाळाला हातात घेऊन त्या उभ्या होत्या; परंतु गच्चीला कमी उंचीची संरक्षक भिंती असल्याने तोल जाऊन त्या तिसऱ्या मजल्यावरून जमिनीवर कोसळल्या. ही बाब कॉम्प्लेक्‍समधील रहिवाशांना समजली. त्यांनी लगेच तातेड कुटुंबीयांना माहिती दिली. दरम्यान रोहिणी भंडारी यांना त्यांचे भाऊ अजय तातेड यांनी एका खासगी रुग्णालयात, तर मुलाला अन्य एका खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे, उपनिरीक्षक बी. आर. आहेर, सहायक फौजदार दत्ता बोडखे, पोलिस नाईक एस.के. साबळे, वाघचौरे यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करून रोहिणी यांचे भाऊ अजय यांचा जबाबही पोलिसांनी घेतला. या घटनेची नोंद जवाहरनगर ठाण्यात करण्यात आली.

चाळीस दिवसांचेच आयुष्य
चार महिन्यांपासून बाळंतपणासाठी रोहिणी भंडारी माहेरी आल्यानंतर २४ फेब्रुवारीला त्यांना मुलगा झाला. बाळाच्या सुदृढतेसाठी आई प्रयत्नात होती. बाळाला जीवनसत्त्व मिळावे म्हणून उन्हात तिने नेले होते; परंतु जेमतेम चाळीस दिवसांचे आयुष्य घेऊन आलेले बाळ उंचावरून पडल्याने आईसह गतप्राण झाले.

पोलिसांचा दोन्ही बाजूंनी तपास
इमारतीवरून कोसळल्यानंतर अपघात आहे की आत्महत्या? याबाबत पोलिसांना शंका असून तपासासाठी जवाहरनगर पोलिसांनी रोहिणी भंडारी यांचा मोबाईल जप्त केला आहे. या प्रकरणाचा दोन्ही बाजूंनी तपास करीत असल्याचे पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news mother and child death in accident