गिर्यारोहक मनीषा दुसऱ्यांदा करणार एव्हरेस्टची चढाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

औरंगाबाद - गेल्या वर्षी खराब हवामानामुळे अवघ्या १७० मीटरने सर्वाधिक उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टने औरंगाबादच्या मनीषा वाघमारेला हुलकावणी दिली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी मनीषा एव्हरेस्ट सर करण्यासाठी सज्ज झाली आहे; पण यंदा मोहीम फत्ते करण्यासोबतच तिच्या डोक्‍यावर १७ लाखांच्या कर्जाचा डोंगर कायम आहे.

औरंगाबाद - गेल्या वर्षी खराब हवामानामुळे अवघ्या १७० मीटरने सर्वाधिक उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टने औरंगाबादच्या मनीषा वाघमारेला हुलकावणी दिली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी मनीषा एव्हरेस्ट सर करण्यासाठी सज्ज झाली आहे; पण यंदा मोहीम फत्ते करण्यासोबतच तिच्या डोक्‍यावर १७ लाखांच्या कर्जाचा डोंगर कायम आहे.

अनेक खंडांतील सर्वोच्च शिखरे सर करणारी गिर्यारोहक मनीषा वाघमारे २०१७ मध्ये माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी रवाना झाली होती. खराब हवामानामुळे तिला माघारी फिरावे लागले होते. तिला शिखरमाथ्याने अवघ्या १७० मीटर अंतराने हुलकावणी दिली होती. सोबतच असलेल्या ऑक्‍सिजन सिलिंडरच्या साथीने तिने आपल्या संघातील एकाचा प्राणही वाचवला होता. यंदा एप्रिल २०१८ पासून ती पुन्हा एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना होणार असून यंदा ऑक्‍सिजन सिलिंडरचा दुप्पट साठा घेऊन ती या मोहिमेसाठी जाणार आहे. विशेष म्हणजे ‘डेथ झोन’ म्हणून परिचित असलेल्या कॅम्प फोरपुढील भागात १२ तास मोठ्या मुश्‍किलीने थांबता येते, या जागेवर मनीषाने खराब हवामान आणि उणे ७५ अंश तापमानात ४८ तासांचा काळ काढला होता. यंदाच्या प्रयत्नात आपण चढाईसाठी पोषक असलेल्या हवामानाच्या काळात सुरवातीलाच शिखरमाथा सर करण्यासाठी पुढे जाणार असल्याचे मनीषाने पत्रकार परिषदेत सोमवारी (ता. आठ) सांगितले. इंडियन कॅडेट फोर्सची स्वयंसेवक असलेल्या मनीषाच्या पत्रपरिषदेला कमांडर विनोद नरवडे, जगदीश खैरनार, प्राचार्या वसुधा पुरोहित, राहुल दुधमांडे, प्रशिक्षक शशी सिंग, गौतम पातारे आदींची उपस्थिती होती. या कार्यासाठी महाविद्यालयाकडूनही तिला मदत करणार असल्याचे प्राचार्या पुरोहित म्हणाल्या. 

कर्जाचा बोजा कायम 
गतवर्षी हाती घेतलेल्या मोहिमेसाठी तिला अवघे ७ लाख रुपये प्रायोजकांकडून मिळाले होते. उर्वरित रक्कम जुळवण्यासाठी तिने १७ लाखांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या बोजासह तिने दुसऱ्यांदा मोहीम आखली आहे. यंदा तिला २७ लाख ७० हजारांची आवश्‍यकता आहे.

१ एप्रिलला रवाना होणार
मनीषाने गेल्या वर्षीच्या १ जुलैपासूनच सरावाला सुरवात केली आहे. यात व्यायामासह हृदय आणि फुप्फुसाशी संबंधित व्यायामाचा समावेश आहे. यंदा ‘समिट’साठी खुल्या झालेल्या विंडोच्या सुरवातीलाच शिखरमाथा गाठण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनीषा म्हणाली.

Web Title: aurangabad marathwada news Mountaineer manisha waghmare everest