'एमपीएससी'चे आता पुढचे पाऊल

प्रवीण मुके
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकपदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतल्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट "क' पदांसाठीही हाच "फॉर्म्युला' वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे.

औरंगाबाद - सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकपदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतल्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट "क' पदांसाठीही हाच "फॉर्म्युला' वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे.

गट "ब' अराजपत्रित संवर्गातील सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या पदांसाठी 2016 पर्यंत वेगवेगळ्या पूर्व परीक्षांचे आयोजन केले जात असे. आयोगाने या तीन पदांसाठी एकत्र पूर्वपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही केली; परंतु या पदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या लक्षात घेता अभ्यासक्रमाच्या आधारे प्रत्येक पदासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे. डिसेंबरच्या शेवटी तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षा होतील.

हा "फॉर्म्युला' यशस्वी झाल्यामुळे आयोगाने आता गट "क' पदांसाठीही याच पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक व बृहन्मुंबईतील विविध शासकीय कार्यालयांतील लिपिक-टंकलेखक या संवर्गातील पदे भरण्यासाठी 2018 पासून संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे. त्यात जाहिरातीला अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते यापैकी एक, दोन किंवा तीनही पदांसाठी बसू इच्छितात काय, याचा विकल्प (ऑप्शन) भरून घेण्यात येईल. भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्‍चित केली जाईल. पूर्वपरीक्षेचे निकाल मात्र स्वतंत्र जाहीर करण्यात येतील. मुख्य परीक्षाही प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र घेतली जाईल. दरम्यान, मुख्य परीक्षेबाबतचे सविस्तर निवेदन आयोगातर्फे लवकरच जाहीर होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आयोगाचा निर्णय स्वागतार्ह आहे. खरे म्हणजे वर्ग दोन आणि तीनची सर्व पदे एकत्र करून त्या त्या पदांच्या संयुक्त पूर्वपरीक्षा व्हायला हव्यात. त्या दृष्टीने आयोगाने ही चांगली सुरवात केली, असे म्हणावे लागेल. यातून विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे वेळापत्रकही निश्‍चित होईल.
- कृष्णा भोगे, निवृत्त सनदी अधिकारी

Web Title: aurangabad marathwada news mpsc exam